८९ जणांना मिळाले हक्काचे घर !
By Admin | Updated: January 20, 2015 00:47 IST2015-01-20T00:47:17+5:302015-01-20T00:47:17+5:30
डोणगाव येथील ग्रामस्थांचा असाही पुढाकार, ग्रामसभेत घेतला ठराव.

८९ जणांना मिळाले हक्काचे घर !
सचिन गाभणे /डोणगाव (बुलडाणा): शासनाच्या इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गत येथील बेघरांना घरकुल मंजूर झाले; परंतु त्यांच्याकडे स्वत:ची जागाच नसल्याने त्यांना घरकुल योजनेपासून वंचित रहावे लागत होते. अशा बेघरांना हक्काचे घर मिळावे म्हणून ग्रामपंचायतने ८९ कुटुंबीयांना घरकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देत बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करून दिले. अन्न, वस्त्र, निवारा मानवाच्या मूलभूत गरजा समजल्या जातात. अन्न व वस्त्रासाठी मानव दिवसभर राबतो; मात्र एवढे करूनही या महागाईच्या काळात विसाव्यासाठी डोक्यावर हक्काचे छत तो उभारू शकत नाही. त्यामुळे शासनस्तरावरून घरकुलसारख्या योजना राबविल्या जातात. प्रत्येकाला आपले स्वत:चे घर असावे, असे वाटते. त्यानुसार शासनाच्या घरकुल योजनेत आपला समावेश होऊन हक्काचे घर मिळावे अशी धडपड अनेक बेघरांची सुरू असते. अनेकांजवळ शासनाच्या योजना असूनही स्वत:च्या मालकीची जागा घर बांधण्यासाठी नसते. शेवटी त्यांचा संसार उघड्यावरच राहतो असे चित्र आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायत अंतर्गत दारिद्रय़रेषेखालील लोकांना ह्यइंदिरा आवास घरकुलह्ण योजनेंतर्गत घरकुले मंजूर करून घरकुल बांधण्यासाठी शासनाच्यावतीने लाभार्थी यादी मंजूर झाली होती; परंतु अनेक लाभार्थ्यांजवळ मालकीची जागाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांना जागेअभावी घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत होते. गावातील आपलेच बांधव स्वत:च्या घरापासून वंचित राहत असल्याचे समजताच सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र आले. त्यांनी सरंपच व ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा केली. सरपंच संजय आखाडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेऊन हक्काची जागा नसलेल्यांना घरकुलासाठी ते राहत असलेली अतिक्रमित शासकीय जागा मोजून देण्याचा ठराव घेतला. त्याचबरोबर त्या जागेची गाव नमुना आठ ह्यअह्ण ची नक्कलही सर्व लाभार्थ्यांना देण्यात आली. बेघरांच्या स्वप्नातील घरकुल साकार करण्यासाठी व शासनाची मदत इंदिरा आवास योजनेंतर्गत मिळण्यासाठी बेघरांना ग्रा.पं.च्या अख्त्यारीतील जागा देण्याच्या ग्रामस्थांच्या एकमुखी निर्णयाने ८९ कुटुंबीयांना हक्काचे छत मिळाले. दारिद्रय़रेषेखालील लाभार्थ्यांना गाव नमुना आठ 'अ' ची नक्कल देऊन त्यांच्या घराचे स्वप्न साकार केले. आणखी ६00 घरकुल प्रस्तावित आहेत. त्यात अनेकांकडे मालकीची जागा उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून त्यांनाही हक्काचे घर देण्याचा प्रयत्न असल्याचे डोणगावचे सरपंच संजय आखाडे यांनी सांगीतले.