77 Thousand quintals of seed will be required for Rabi season | रब्बी हंगामासाठी लागणार ७७ हजार क्विंटल बियाणे
रब्बी हंगामासाठी लागणार ७७ हजार क्विंटल बियाणे

अकोला : खरिप हंगामात सतत पाऊस आल्याने पीकपेऱ्यात बदल होण्याची शक्यता गृहित धरत कृषी विभागाने रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी सुधारित नियोजन केले आहे. त्यानुसार पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार असून, १ लाख ४५ हजार ८०० हेक्टरवर पेरणीसाठी ७७ हजार ५३१ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने हरभरा, गव्हाचा समावेश आहे.
गेल्या तीन वर्षात रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्राचा विचार केल्यास सरासरी १ लाख १५ हजार ४६६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. चालू वर्षात पावसातील सातत्याने खरिपात मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे खरिपाची पिके वाया गेलेल्या क्षेत्रातही रब्बीची पेरणी होऊ शकते. त्यासाठी कृषी विभागाने रब्बी पेरणीचे सुधारित नियोजन केले. त्यानुसार जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र २०० हेक्टर राहणार आहे, तर गहू ३० हजार हेक्टर, हरभरा- १ लाख १५ हजार हेक्टर, करडई-२०० हेक्टर, मका- ३०० हेक्टर, सूर्यफूल- १०० हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यासाठी बियाण्यांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये गहू-३०००० क्विंटल, हरभरा-४७४३८ क्विंटल लागणार आहे. एकूण बियाण्यांपैकी सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादकांकडून ४३७४५ क्विंटल तर खासगी उत्पादक कंपन्यांकडून ३३७९४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होणार आहे. महाबीजकडून ४००४५ क्विंटल बियाणे मिळण्याची मागणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.

 


Web Title: 77 Thousand quintals of seed will be required for Rabi season
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.