जिल्हा योजनांचा ७६ टक्के निधी अखर्चित
By Admin | Updated: November 24, 2015 01:54 IST2015-11-24T01:54:58+5:302015-11-24T01:54:58+5:30
विविध यंत्रणांमार्फत केवळ २३.९७ टक्के निधी खर्च.

जिल्हा योजनांचा ७६ टक्के निधी अखर्चित
संतोष येलकर / अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यात विविध योजना आणि विकासकामांसाठी १३९ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर असला तरी संबंधित यंत्रणांमार्फत मंजूर तरतुदीच्या तुलनेत ऑक्टोबर अखेरपर्यंत केवळ ३३ कोटी ५४ लाख ६६ हजार (२३.९७ टक्के ) निधी खर्च करण्यात आला असून, विविध योजनांचा उर्वरित ७६ टक्के निधी अद्याप अखर्चित आहे. अखर्चित असलेल्या निधीमधील योजना आणि विकासकामे रखडली आहेत. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २0१५-१६ या वर्षात जिल्ह्यात कृषी व संलग्न सेवा, ग्रामविकास, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे आणि पूरनियंत्रण, ऊर्जा, उद्योग व खाण, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा , सामान्य सेवा आणि नावीन्य, बळकटीकरण व मूल्यमापन आदी योजना व विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १३९ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. मंजूर करण्यात आलेला हा संपूर्ण निधी शासनामार्फत जिल्ह्यासाठी प्राप्त झाला. विविध विभागांच्या मागणीनुसार प्राप्त निधीतून जिल्हा नियोजन विभागामार्फत ऑक्टोबर अखेरपर्यंत ६४ कोटी ६५ लाख ४ हजार रुपयांचा निधी संबंधित विभागांना वितरित करण्यात आला. वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून विविध यंत्रणांमार्फत ऑक्टोबर अखेरपर्यंत ३३ कोटी ५४ लाख ६६ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. एकूण मंजूर निधीच्या तुलनेत ऑक्टोबर अखेरपर्यंत यंत्रणांमार्फत विविध योजना आणि विकासकामांवर २३.९७ टक्के निधी खर्च करण्यात आला असून, उर्वरित ७६ टक्के निधी खर्च होणे अद्याप बाकी आहे. त्यानुषंगाने अखर्चित असलेल्या निधीमधील योजना आणि विकासकामे रेंगाळली आहेत.