रस्ते कामांसाठी ७0 ग्रामपंचायतींशी करारनामे!
By Admin | Updated: March 28, 2016 01:36 IST2016-03-28T01:36:29+5:302016-03-28T01:36:29+5:30
अकोला जिल्हय़ातील १९४ कामांची अंदाजपत्रके तयार.

रस्ते कामांसाठी ७0 ग्रामपंचायतींशी करारनामे!
संतोष येलकर / अकोला
जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्हय़ातील ग्रामीण भागात पाच कोटींच्या निधीतून १९४ रस्ते कामांची अंदाजपत्रके अखेर तयार करण्यात आली असून, त्यापैकी ७0 रस्त्यांच्या कामांसाठी संबंधित ग्रामपंचायतींशी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करारनामे करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्हय़ातील ग्रामीण भागात अंतर्गत रस्ते कामांसाठी पाच कोटींच्या निधीतून, जिल्हा परिषद सर्कलनिहाय कामांचे नियोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या कारभारात आधीच रस्ते कामांचे नियोजन करण्यास विलंब झाला असताना, नियोजनानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभाग स्तरावर रस्ते कामांची अंदाजपत्रके तयार करणे व प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया रखडली होती. अखेर गत पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील १९४ रस्त्यांच्या कामांची तयार करण्यात आलेली अंदाजपत्रके जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्राप्त झाली. त्यानंतर १९४ रस्ते कामांपैकी ७0 रस्ते कामांसाठी संबंधित ग्रामपंचायतीसोबत जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करारनामे करण्यात आले. तसेच १५ रस्ते कामांचे कार्यारंभ आदेशही (वर्क ऑर्डर) देण्यात आले असून, करारनामे झालेल्या इतर कामांच्या ह्यवर्क ऑर्डरह्ण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. करारनामे करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमार्फत रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. रखडलेली कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली असून, कामांचे करारनामे व ह्यवर्क ऑर्डरह्ण देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या रस्ते कामांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.