६४७ जोडप्यांची दुभंगलेली मने पुन्हा जुळली!
By Admin | Updated: April 1, 2017 02:59 IST2017-04-01T02:59:07+5:302017-04-01T02:59:07+5:30
महिला सुरक्षा कक्षाचे यश; घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आलेला संसार फुलला!

६४७ जोडप्यांची दुभंगलेली मने पुन्हा जुळली!
नितीन गव्हाळे
अकोला, दि. ३१- महिलांवर होणार्या अत्याचारामध्ये अकोला जिल्हा आघाडीवर आहे. जिल्हय़ातच नव्हे तर शहरात दररोज कुठे ना कुठे महिला हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार, मानसिक व शारीरिक छळाच्या बळी ठरताहेत. राज्य शासनाने पोलिसांच्या मदतीने सुरू केलेल्या महिला सुरक्षा विशेष कक्षामध्ये दररोज पती, पत्नीतील वादाच्या तक्रारी सातत्याने येतात. या तक्रारींचा निपटारा करून पती, पत्नीतील वाद कायमचा संपुष्टात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. महिला तक्रार निवारण विशेष कक्षाने गेल्या तीन वर्षांमध्ये मोडणारे ६४७ संसार जुळविण्यात यश मिळवले आणि आज हे संसार आनंदाने नांदताहेत.
जिल्हय़ात महिला अत्याचाराच्या घटना दररोज घडतात. परिणामी, त्यात महिलांचा बळी जातो. वादविवाद होतात. घटस्फोट घेण्यापर्यंत मजल जाते. त्यात मुलाबाळांची आबाळ होते. महिलांवरील वाढत्या अत्याचाराला प्रतिबंध घालता यावा, पती-पत्नीत तडजोड व्हावी, त्यांना मार्गदर्शन मिळून त्यांच्यातील वाद संपुष्टात यावे आणि पुन्हा त्यांच्या संसाराची गाडी रुळावर यावी, या दृष्टिकोनातून राज्य शासनाने १ मे १९९७ पासून महिला तक्रार निवारण कक्ष सुरू केला.
अकोल्यातही हा कक्ष सुरू आहे. पोलीस अधीक्षकांच्या कार्यालय परिसरात हा कक्ष आज उभा आहे. या कक्षाच्या प्रमुख म्हणून सहायक पोलीस निरीक्षक वैशाली आढाव या पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात काम पाहतात. तसेच पती, पत्नींच्या तक्रारीनुसार दोघांनाही बोलावून राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशा मिरगे, सेवानवृत्त न्यायाधीश विमल लोहिया, प्रा. निशा बाहेकर, अख्तर बेगम, शहनाज आदी समुपदेशन करतात. या कक्षाच्या तीन वर्षांंच्या कामगिरीचा आढावा घेतला असता, अनेक सकारात्मक बाबी समोर आल्या. गेल्या तीन वर्षांमध्ये या कक्षामध्ये पती-पत्नीतील वादाच्या १७५८ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी ६४७ तक्रारींचा निपटारा करून पती-पत्नीमध्ये तडजोड घडविण्यात आली. २९३ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले. तीन वर्षांमध्ये कक्षातील महिला कर्मचारी, अधिकार्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक जोडपी सुखी संसार करीत आहेत. ही बाब समाजासाठी सुचिन्हे निर्माण करणारी आहे.
पोलिसांच्या माध्यमातून महिला सुरक्षा कक्षाकडे आलेल्या तक्रारींनुसार आम्ही पती, पत्नीला बोलावून त्यांचे समुपदेशन करतो. दोघांच्या भांडणामुळे दोन्ही कुटुंबासह मुलाबाळांवर काय परिणाम होतो, याची जाणीव करून देतो; परंतु काही जोडपी समजूत काढल्यानंतरही काडीमोड घेतात. त्यांचे प्रकरण आम्ही पोलीस ठाण्याकडे पाठवितो.
- वैशाली आढाव, सहायक पोलीस निरीक्षक
प्रमुख, महिला तक्रार निवारण कक्ष
महिला तक्रार निवारण कक्षात आलेल्या तक्रारी
वर्ष तक्रारी आपसात गुन्हे दाखल
२0१४ ५५0 २२८ ८८
२0१५ ५५६ २५0 १२२
२0१६ ५८७ १३९ ६४
२0१७ ६५ ३0 १९