५७ सरपंच, सचिवांना कारवाईचा इशारा!
By Admin | Updated: November 29, 2014 01:13 IST2014-11-29T01:13:19+5:302014-11-29T01:13:19+5:30
आकोट ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपट्टी वसुलीच्या कर्तव्यात कसूर करणार्या ५७ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामसेवकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा.

५७ सरपंच, सचिवांना कारवाईचा इशारा!
संतोष येलकर / अकोला
जिल्ह्यातील आकोट ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपट्टी वसुलीच्या कर्तव्यात कसूर करणार्या ५७ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामसेवकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी शुक्रवारी बजावलेल्या नोटीसद्वारे दिला. जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत ५७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना या नोटीस निर्गमित करण्यात आल्या.
जिल्ह्यातील आकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ८८ गावांना पाणीपुरवठा केला जातो. ही योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घ्यावी किंवा योजनेच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी दरमहा १५ लाख २५ हजार अदा करावे, अन्यथा योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याची नोटीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या यवतमाळ येथील जलव्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत गेल्या महिन्यात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाली. ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल, दुरुस्ती खर्चाचे देयक जिल्हा परिषद सेस फंडातून अदा केल्यास जिल्हा परिषदेवर आर्थिक बोजा पडेल. त्यामुळे या देयकाची रक्कम पाणीपट्टी वसुलीच्या रकमेतून अदा करण्याचे १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले. त्यासाठी पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढविणे आवश्यक असून, पाणीपट्टी वसुलीच्या कामात कसूर करणार्या संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचेही सभेत ठरविण्यात आले होते. ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत ५७ ग्रामपंचायतींकडून गत ऑक्टोबर अखेरपर्यंत ६0 टक्के पाणीपट्टी वसुली अपेक्षित होती. तथापि, केवळ दोन टक्के पाणीपट्टी वसुली झाली आहे. या पृष्ठभूमीवर पंचायत राज समितीने केलेल्या शिफरशीप्रमाणे कलम ३९ (१) अन्वये पाणीपट्टी वसुलीच्या कर्तव्यात कसूर करणार्या सरपंचांना पदावरून काढून टाकण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
ग्रामसेवकांविरुद्ध शिस्तभंगाची (निलंबन) कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सीईओ अरुण उन्हाळे यांनी ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत ५७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना बजावलेल्या नोटीसमध्ये दिला आहे. जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत ५७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना शुक्रवारीच या नोटीस निर्गमित करण्यात आल्या.