मनपात बांधकाम परवानगीच्या ५६ प्रकरणांचा सोक्षमोक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 16:15 IST2019-05-28T16:14:58+5:302019-05-28T16:15:02+5:30
रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने ५६ पेक्षा अधिक प्रस्ताव निकाली काढत घर बांधकामाची परवानगी दिली.

मनपात बांधकाम परवानगीच्या ५६ प्रकरणांचा सोक्षमोक्ष
अकोला: घराच्या नकाशाला परवानगी देताना नगररचना विभागाकडून अनेकदा त्रुटी काढली जाते. या त्रुटीची पूर्तता करताना सर्वसामान्यांच्या नाकीनऊ येते. ही बाब ध्यानात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी सोमवारी नगररचना विभागात शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्रलंबित प्रस्ताव मंजूर केले जाणार असल्याने मालमत्ताधारकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने ५६ पेक्षा अधिक प्रस्ताव निकाली काढत घर बांधकामाची परवानगी दिली.
घराच्या बांधकामासाठी मनपाच्या नगररचना विभागाची परवानगी क्रमप्राप्त आहे. या विभागात नकाशा मंजुरीसाठी दाखल प्रस्तावांमध्ये त्रुटी निघतात. अनेकदा संबंधित अधिकारी-कर्मचारी कामात व्यस्त असल्याने संबंधित मालमत्ता धारकांसोबत संवाद साधणे शक्य होत नाही. त्यामुळे त्रुटींची पूर्तता करण्यात बराच कालावधी निघून जातो. नगररचना विभागामध्ये बांधकाम नकाशे मंजुरीसाठी प्रस्तावित होते. संबंधित मालमत्ताधारकांनी त्रुटींची पूर्तता केल्यानंतर सदर प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी नगररचना विभागात शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात मालमत्ताधारकांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी नगररचनाकार संजय पवार, सहा. नगररचनाकार संदीप गावंडे यांच्यासह नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांनी कामकाज निकाली काढले.
रात्री १० पर्यंत कामकाज
सर्वसामान्यांच्या सोयीसाठी नगररचना विभागात दुपारी अडीच वाजता शिबिराला प्रारंभ झाला. यावेळी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी स्वत: आयुक्त संजय कापडणीस उपस्थित होते. ते सायंकाळी ७ वाजता निघून गेल्यावर या विभागातील कर्मचाऱ्यांनी रात्री १० पर्यंत उर्वरित कामकाज पूर्ण केले. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा उद्या केला जाणार असल्याची माहिती आहे.