निवडणूक रिंगणातील ५६ उमेदवारांवर गुन्हे
By Admin | Updated: February 18, 2017 02:37 IST2017-02-18T02:37:07+5:302017-02-18T02:37:07+5:30
सर्वच पक्षांचा समावेश; अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वाधीक.

निवडणूक रिंगणातील ५६ उमेदवारांवर गुन्हे
अकोला, दि. १७- महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहचला असून, सर्वच उमेदवार आपण कसे स्वच्छ प्रतिमेचे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत. परंतु, निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या एकूण ५७९ उमेदवारांपैकी ५६ उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे, या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून समोर आले आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याबद्दल प्रत्येक जण दुसर्याकडे बोट दाखवत असला, तरी सर्वच राजकीय पक्षांनी गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारिप-बमसं, संभाजी ब्रिगेड, समाजवादी पक्ष, एमआयएम, रिपाइं, बहुजन मुक्ती मोर्चा आदी पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार उभे आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार या उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करून वैयक्तिक माहिती सादर करावी लागते. यामध्ये शिक्षण, स्थावर व जंगम मालमत्ता, कर्ज व गुन्हे दाखल आहेत का, आदी माहितीचा समावेश असतो. महापालिकेच्या निवडणुकीसाठी २0 प्रभागांतून ८0 जागांसाठी ५७९ उमेदवार उभे आहेत. या उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, यापैकी ५६ उमेदवारांविरुद्ध दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा होऊ शकेल, अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी अनेक उमेदवारांविरुद्ध राजकीय आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत, तर काहींवर गंभीर गुन्हे आहेत. दोषसिद्धी झाल्यास त्यांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक कारावासाची शिक्षा होऊ शकते. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक १0 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये १२ अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ, काँग्रेसचे पाच, भारिपचे सहा, मनसे, संभाजी ब्रिगेड व इतर प्रत्येकी एक असा क्रम लागतो.
५९ उमेदवार कोट्यधीश
निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी ५९ उमेदवारांची संपत्ती १ ते १८ कोटीपर्यंत आहे, तर ५४ उमेदवारांची संपत्ती ५0 लाखांपेक्षा अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. कोट्यधीश उमेदवारांमध्ये सर्वाधिक १४ उमेदवार भाजपचे आहेत. त्यानंतर शिवसेना १२, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष प्रत्येकी नऊ, भारिप-बमसं चार, मनसे आणि संभाजी ब्रिगेड प्रत्येकी एक, असा क्रम आहे. रिंगणातील २४ उमेदवारांवर थकीत कर्ज असल्याचेही समोर आले आहे.