५४ गुन्हेगार शहरातून तडीपार; ‘एसडीओ’चा आदेश
By Admin | Updated: September 7, 2015 01:43 IST2015-09-07T01:43:37+5:302015-09-07T01:43:37+5:30
उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोल्यातील तीन पोलीस ठाणे अंतर्गत ५४ गुन्हेगार शहरातून तडीपार.

५४ गुन्हेगार शहरातून तडीपार; ‘एसडीओ’चा आदेश
अकोला : कावड-पालखी उत्सव, पोळा व गणेश उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोल्यातील तीन पोलीस ठाणे अंतर्गत ५४ गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शनिवारी दिला. ६ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव, ७ सप्टेंबर रोजी कावड-पालखी उत्सव, ९ सप्टेंबर रोजी गोगाजी नवमी, १२ सप्टेंबर पोळा, १३ सप्टेंबर रोजी पोळ्याची कर, १७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी, २५ सप्टेंबर रोजी बकरी ईद व २७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक इत्यादी उत्सवांच्या कालावधीत शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोल्यातील तीन पोलीस ठाणे अंतर्गत ५४ गुन्हेगारांना ६ ते २३ दिवसांच्या कालावधीसाठी शहरातून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस विभागाच्या प्रस्तावानुसार खदान पोलीस ठाणे अंतर्गत १९ गुन्हेगारांना २३ दिवसांसाठी, सिव्हिल लाइन्स पोलीस ठाणे अंतर्गत २६ गुन्हेगारांना ७ दिवसांसाठी आणि सिटी कोतवाली पोलीस ठाणे अंतर्गत ९ गुन्हेगारांना ६ दिवसांच्या कालावधीसाठी शहरातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी संजय खडसे यांनी दिला. तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार तडीपारीच्या कालावधीत शहरात राहणार नाही, याबाबत संबंधित पोलीस ठाण्याने दक्षता घ्यावी, असे निर्देशही उपविभागीय दंडाधिकार्यांकडून देण्यात आले.