नादुरुस्त मीटरचे ५२ हजारांचे देयक
By Admin | Updated: October 28, 2014 00:28 IST2014-10-28T00:28:27+5:302014-10-28T00:28:27+5:30
महावितरणचा अजब कारभार, ग्राहकाची अभियंत्यांकडे तक्रार.

नादुरुस्त मीटरचे ५२ हजारांचे देयक
अकोला : विजयनगर तारफैल विभागात राहणार्या सफाई कामगाराच्या घरील नादुरुस्त मीटरचे एका महिन्याचे ५२ हजार ८२0 रुपयांचे देयक महावितरणने दिले आहे. या प्रकाराने महावितरणचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.
आर्थिक स्थिती जेमतेम असलेले जोगेंद्र अनुप खरारे हे सफाई कामगार विजयनगर परिसरात राहतात. त्यांनी शहर उपविभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या घरात विद्युत मीटर असून, ग्राहक क्रमांक ३१00७३६0५0९१ हा आहे. त्यांना ऑगस्ट २0१४ चे घरगुती वापराचे विद्युत देयक ५२ हजार ८२0 रुपये देण्यात आले. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीसही मिळाली आहे. दरम्यान, खरारे यांच्या घरा तील मीटर नादुरुस्त आहे. त्यांनी तशा प्रकारची तक्रार यापूर्वीच दाखल केली होती. त्यानंतर नवीन मीटर बसविण्यात आले. या मीटरने त्यांना चक्क ५२ हजारांचे बिल दिले. त्यामुळे खरारे त्रस्त झाले आहेत. या प्रकाराची तक्रार त्यांनी शहर उपविभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे केल्यानंतर महावितरण कर्मचारी मीटर तपासणीकरिता घेऊन गेले. मीटर दुरुस्त असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे खरारे यांच्यापुढे विचित्र स्थिती उभी ठाकली आहे. विजेचे बिल कमी झाले नाही, तर महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी निवेदनामध्ये दिला आहे.