५१९ सिमेंट नालाबांधांचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: March 5, 2015 02:00 IST2015-03-05T02:00:24+5:302015-03-05T02:00:24+5:30
अकोला जिल्ह्यातील १६ कोटींचा निधी प्राप्त; लवकरच सुरू होणार कामे.

५१९ सिमेंट नालाबांधांचा मार्ग मोकळा
संतोष येलकर / अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील सिमेंट नालाबांधांच्या कामांसाठी १६ कोटींचा निधी २0 फेब्रुवारी रोजी शासनाकडून प्राप्त झाला. त्यामुळे सिमेंट नालाबांधांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्ह्यात लवकरच ही जलसंधारणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात वारंवार उद्भवणार्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात सन २0१५-१६ मध्ये अमरावती विभागात १ हजार ३९६ गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जलसंधारणाची विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानात अकोला जिल्ह्यातील २00 गावांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जिल्ह्यात ५१९ सिमेंट नालाबांधांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. सिमेंट नालाबांधांची कामे हाती घेण्यासाठी शासनामार्फत जिल्हानिहाय निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ५१९ सिमेंट नाला बांधांच्या कामांसाठी १६ कोटींचा निधी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत २0 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून, जिल्ह्यात संबंधित यंत्रणांकडून सिमेंट नाला बांधांची कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी लघू पाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत अंदाजपत्रके तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ऑनलाईन निविदा प्रक्रियाद्वारे या कामांचे वाटप केले जाणार आहे. सिमेंट नालाबांधांची जिल्ह्यातील कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.