५0 लाखांच्या मातीची चोरी
By Admin | Updated: May 14, 2017 04:18 IST2017-05-14T04:18:11+5:302017-05-14T04:18:11+5:30
आदिवासीबहुल भागातील पर्यावरण धोक्यात.

५0 लाखांच्या मातीची चोरी
अकोट : अकोट तालुक्यात पोपटखेडच्या धरणाच्या बांधकामाकरिता कुठल्याही प्रकारचा परवाना न घेता अवैधपणे उत्खनन करून ई-क्लासमधील काळी माती चोरून नेत असल्याचा प्रकार सुरू आहे. आतापर्यंत ५0 लाख रुपयांच्यावर किंमत असलेली काळी माती चोरून नेल्याचा अंदाज आहे. नव्याने जिल्हाधिकारी रुजू झाल्यानंतर त्यांच्या नवखेपणाचा फायदा घेत लाखो रुपयांचा महसूल बुडविणार्या स्थानिक महसूल अधिकार्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नसल्याचे सतर्क गावकर्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आदिवासीबहुल भाग असलेल्या महागावमधील कापसी शिवारातील ई-क्लासच्या ११५ गट क्रमांकमधील काळी माती रात्री सर्रास पोकलँडने उत्खनन करून टिप्परद्वारे पोपटखेड धरणाच्या कामावर नेण्यात येत आहे. महसूल विभागाची कुठलीही परवानगी नसताना अवैध उत्खनन करून वाहतूक करीत या काळ्या मातीचा साठा पोपटखेड धरणावर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातून काळी माती चोरून नेल्या जात असल्याने शेकडो झाडे तोडल्या गेली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा र्हास झाला आहे. शासनाने अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध व्हावा, या प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि राज्याच्या महसुलात वाढ व्हावी, याकरिता अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. या अटी व शर्ती पायदळी तुडवत पोपटखेड धरणाचे ठेकेदार एन.व्ही. भास्कर रेड्डी यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या यंत्रणेने या भागातील काळी माती सर्रासपणे चोरून नेल्या जात आहे. या गंभीर प्रकाराकडे अकोट येथील महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मोठय़ा प्रमाणात ई-क्लासमधील माती रात्रंदिवस टिप्परद्वारे जात असताना सतर्क गावकर्यांच्या मनात शंका आल्याने त्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहिले असता ठिकठिकाणी ५४ मीटर लांब १७ मीटर रुंद व ३ मीटरचे खोल पडलेले खड्डे या ठिकाणी आढळून आले. कामावर असलेल्या सुपरवायझरला विचारणा केली असता त्याने गावकर्यांशी हुज्जत घालून दमदाटी केली. याबाबत गावकर्यांनी अकोट तहसीलदार विश्वनाथ घुगे यांना तोंडी माहिती दिली असता त्यांनी अनभिज्ञता दाखवित तलाठी वाकपांझर यांना कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानुसार घटनास्थळावर १२ मे रोजी रात्री पंचनामा केला असता ई-क्लासच्या जमिनीवरील माती तन्वी एन्टरप्रायजेस व एन.व्ही.व्ही.आर. या कंपनीला पोपटखेड धरणाकरिता विनापरवाना नेल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी तहसीलदार कारवाई करतील. ते तपासणीकरिता गेले होते. काय कारवाई करण्यात आली, हे उद्या समजेल.
- उदय राजपूत,
उपविभागीय अधिकारी अकोट.