अकोला जिल्ह्यात ५ हजार ५४७ जलमित्र करणार महाराष्ट्रदिनी महाश्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:01 IST2018-04-30T14:01:43+5:302018-04-30T14:01:43+5:30
जिल्ह्यात १ मे रोजी श्रमदान करण्यासाठी चार तालुक्यांमधून ५ हजार ५४७ जलमित्रांनी नोंदणी केली आहे.

अकोला जिल्ह्यात ५ हजार ५४७ जलमित्र करणार महाराष्ट्रदिनी महाश्रमदान
अकोला : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी जिल्हाभरात जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदानाचे तुफान आले आहे. या तुफानाचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रदिनी राज्यभर महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात १ मे रोजी श्रमदान करण्यासाठी चार तालुक्यांमधून ५ हजार ५४७ जलमित्रांनी नोंदणी केली आहे. तेल्हारा तालुक्यात विदर्भातून सर्वाधिक जलमित्रांची नोंदणी झाली आहे.
पाणी फाउंडशेनच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ सध्या जिल्ह्यात सुरू आहे. अभिनेता आमिर खान यांनी खंडाळा गावात भेट दिल्याने श्रमदान करणाऱ्या युवकांमध्ये उत्साह वाढला आहे. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जलमित्रांची आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांत वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदान करण्यात येत आहे. या चारही तालुक्यांत ५ हजार ५४७ जलमित्रांनी श्रमदानासाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे.
शहरातील लोकांना ग्रामीण परिस्थितीची जाणीव व्हावी, तसेच आपण पित असलेले पाणी हे कोण्यातरी धरणाचे आहे. त्यावर शेतकºयांचा अधिकार आहे. ते पाणी सिंचनासाठी आहे. मात्र, आपण ते पिण्यासाठी वापरतो. त्यामुळे त्याचा ऋणातून उतराई होण्यासाठी खºया अर्थाने गावाकडे जाऊन आपण श्रमदान केले पाहिजे. सरकारी कर्मचारी, युवक, विद्यार्थी, महिला यांनी महाश्रमदानात सहभाग घेतला पाहिजे. ते काळाची गरज आहे, असे आवाहन आमिर खान यांनी केले आहे.
अशी झाली जलमित्रांची नोंदणी
तेल्हारा- ४४६१
अकोट- ४०७
पातूर- ३९५
बार्शीटाकळी- २८४
या गावात होणार महाश्रमदान
तालुका गाव
तेल्हारा - चितलवाडी, गाडेगाव
अकोट- शहापूर
बार्शीटाकळी - कान्हेरी सरप
पातूर- चतारी
अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी, पातूर या चारही तालुक्यांत महाश्रमदान होणार आहे. यासाठी राज्यातून दूरवरून आॅनलाइन नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. शहरातील लोकांनीदेखील गावाकडे जाऊन दोन हात व दोन तास महाश्रमदानात द्यावे व गावाकडील लोकांचा उत्साह वाढवावा. तुमचे दोन तास व दोन हात दुष्काळ निवारण्यासाठी आवश्यक आहेत.
- नरेंद्र सुभाष काकड, जिल्हा समन्वयक पाणी फाउंडेशन, अकोला