इंदोरच्या कंत्राटदाराकडे सापडली ५ लाखाची रोकड
By Admin | Updated: October 1, 2014 01:13 IST2014-10-01T01:13:00+5:302014-10-01T01:13:00+5:30
रामदासपेठ पोलिस व आयकर विभागाच्या चौकशीनंतर व्यापार्यास परत केली रोकड.

इंदोरच्या कंत्राटदाराकडे सापडली ५ लाखाची रोकड
अकोला : इंदोर येथील कंत्राटदाराच्या कारमध्ये मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ५ लाख १0 हजार रुपयांची रोकड मिळून आल्याने एकच खळबळ उडाली होती; परंतु रामदासपेठ पोलिस व आयकर विभागाच्या चौकशीनंतर सायंकाळी कंत्राटदाराला त्याची रोकड परत करण्यात आली. व्यापार्याने त्याच्या मजुरांना देण्यासाठी ही रोकड आणली होती.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रतनलाल प्लॉटमधील विद्युत भवनासमोर उभ्या असलेल्या एमपी 0९ सीएच १८६१ क्रमांकाच्या कारमध्ये मोठी रोख रक्कम असल्याची माहिती मिळाली. पथकाने या ठिकाणी छापा घातला आणि कंत्राटदाराला कारसह रामदासपेठ पोलिस ठाण्यात आणले. ही कार इंदोर येथील कंत्राटदार रोहित गोविंददास सोमाणी (३८) यांची असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. अकोला शहरात वीज मीटरची छायाचित्रे घेऊन त्याची देयके देण्याचा कंत्राट त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काम करणार्या कर्मचार्यांना वेतन देण्यासाठी ही रोकड सोबत आणल्याचे सोमाणी यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, ही माहिती महसूल विभागाला मिळाल्याने अधिकारी, कर्मचारी व आयकर विभागाच्या अधिकारी रूपा धांडे, निम हे पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी सोमाणी यांची चौकशी सुरू केली. चौकशीअंती सोमाणी यांनी ही रोकड निवडणूकसंबंधीच्या कामासाठी न आणता, त्यांच्या कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठी आणल्याचे स्पष्ट झाल्याने, त्यांची रोकड परत करण्यात आली. या घडलेल्या सर्व प्रकाराचे छायाचित्रण निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने हे येथे विशेष.