कुरिअरच्या ट्रकमधून ४८0 मोबाइल लंपास
By Admin | Updated: July 26, 2016 01:59 IST2016-07-26T01:59:35+5:302016-07-26T01:59:35+5:30
नागपूर-अकोलादरम्यानची घटना.

कुरिअरच्या ट्रकमधून ४८0 मोबाइल लंपास
अकोला : नागपूरवरून जळगाव जात असलेल्या एका खासगी कुरिअर कंपनीच्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८0 मोबाइल लंपास केल्याचा प्रकार सोमवारी रात्री उजेडात आला. सुमारे ५ लाख ४५ हजार रुपयांचे हे मोबाइल असून, अकोला ते नागपूर या दरम्यानच अज्ञात चोरट्यांनी हे मोबाइल पळविले. याप्रकरणी ट्रकचालकाने खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, पोलिसांनी नोंद करून प्रकरण नागपूर पोलिसांकडे वर्ग केले आहे.
नागपूर येथील रहिवासी कुणाल रुपचंद बागडे हे एम एच ४0 एन ५७८0 क्रमांकाचा बाबा कुरिअर सर्व्हिसचा ट्रक घेऊन नागपूरवरून अकोला मार्गे जळगाव खांदेश येथे निघाले होते. सोमवारी पहाटे त्यांनी अकोल्यातील कुरिअरचे साहित्य खाली करण्यासाठी ट्रकची पाहणी केली असता, ट्रकच्या मागचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यानंतर ट्रकमधील साहित्याची तपासणी केली असता, ४८0 मोबाइल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या मोबाइलची किंमत सुमारे ५ लाख ४५ हजार रुपये असून, चालत्या ट्रकमध्येच अज्ञात चोरट्यांनी हा प्रताप केल्याची माहिती चालक बागडे यांनी खदान पोलिसांना दिली. नागपूरवरून निघाल्यानंतर आष्टी चौक येथे ट्रकच्या पाठीमागील भागात दरवाज्याचा आवाज आला होता; मात्र रोडवरील खड्डय़ांमुळे हा आवाज झाल्याचे चालकाला वाटल्याने त्यांनी अकोल्यापर्यंत लक्ष दिले नाही; मात्र अकोल्यातील कुरिअरचे साहित्य खाली उतरविण्यासाठी त्यांनी ट्रकमधील साहित्याची तपासणी केली असता, यामधील ४८0 मोबाइल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. याप्रकरणी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. खदान पोलिसांनी चौकशी सुरु केली असून, प्रकरण नागपूर पोलिसांकडेही वर्ग करण्यात आले आहे.