बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेसाठी मिळाले ४६ कोटी!
By Admin | Updated: July 13, 2017 01:39 IST2017-07-13T01:39:18+5:302017-07-13T01:39:18+5:30
अकोला जिल्ह्याला मिळाले सहा कोटी

बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेसाठी मिळाले ४६ कोटी!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी असलेल्या विशेष घटक योजनेचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना केल्यानंतर स्वरूप बदलले. त्यासाठी चालू वर्षासाठी अमरावती जिल्ह्यातील पाच जिल्ह्यांना ४६ कोटी रुपये निधी मिळणार आहे. त्यापैकी अकोला जिल्ह्यातील लाभार्थींसाठी सहा कोटी रुपये खर्च होणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून लवकरच योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने १९८२-८३ पासून विशेष घटक योजना सुरू केली होती. त्या योजनेतून शेतकरी लाभार्थींना जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण अवजारे, शेतीची सुधारित अवजारे, बैलजोडी, बैलगाडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, पाइपलाइन, पंपसेट, नवीन विहीर निर्मितीसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येत होते. दरम्यान, गेल्या ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या योजनेतून आतापर्यंत किती शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले, यासाठी नागपूर विभागीय कृषी सहसंचालकांच्या समितीने आढावा घेतला. त्यानुसार केलेल्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या. त्यानंतर योजनेचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे करण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूपही बदलले आहे. योजनेतून शेतकऱ्यांना प्राधान्याने विहिरीचा लाभ मिळणार आहे.
त्यासाठी अनुदानाची कमाल रक्कम २ लाख ८५ हजार रुपये आहे. त्यामध्ये नवीन विहीर, त्यासोबत वीज जोडणी, पंपसंच, सूक्ष्म सिंचनासाठी २०१७-१८ पासून शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. योजनेचा चालू वर्षात लाभ देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून लवकरच कार्यवाही सुरू केली जाणार आहे.