43.84 lakh Bt cotton packets arrived! | ४३.८४ लाख बीटी कॉटन पॅकेट आले!

४३.८४ लाख बीटी कॉटन पॅकेट आले!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यावर्षी सोयाबीन बियाणे कमी पडणार असल्याच्या पृष्ठभूमीवर पश्चिम विदर्भात ४३.८४ बीटी कापसाचे पॅकेट पोहोचले आहेत. कापूस बियाण्याची विक्री मात्र संथ गतीने आहे. पाऊस पडल्यानंतरच बियाणे बाजार फुलणार, असे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
विदर्भात यावर्षी ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यानुषंगाने कृषी विभागाने बियाण्याची मागणी नोंदविली आहे. यानुषंगाने कापसाचे बियाणे पोहोचले असून, सोयाबीन बियाण्याचाही पुरवठा झाला आहे. पश्चिम विदर्भातल्या अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी २ लाख ४३ हजार ४५२ क्विंटल सोयाबीन बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. सोयाबीनची उचलही अल्प आहे. याशिवाय तूर २०,३४० क्विंटल, मूग १३,३६७ क्विंटल, उडीद २,१०९ तर ज्वारीचे बियाणे ३,९०३ क्विंटल उपलब्ध झाले आहे.
कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर यावर्षी बियाणे बाजारात पोहोचण्यास विलंब झाला. विशेषकरून काही खासगी कंपन्यांकडून कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बोलावलेले बियाणे, खते घेऊन येण्यास ट्रक चालकांकडून विलंब होत आहे. असे असले तरी बहुतांशी बियाणे पोहोचले असल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे.

अकोला जिल्ह्यात केवळ ४,८३१ क्विंटल बियाणे विक्री!
अकोला जिल्ह्याची स्थिती बघितल्यास आतापर्यंत ४७,६८३ क्विंटल बियाणे बाजारात आले आहे; परंतु प्रत्यक्षात ४,८३१ क्विंटल बियाणेच विविध माध्यमातून शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. त्यामुळे ४२,८५२ क्विंटल बियाणे बाजारात विक्रीविना आहे.


बचत गटाच्या माध्यमातून विक्री!
कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर कृषी विभागाने ‘फिजिकल डिस्टन्स’ पाळता यावे म्हणून शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून खते, बियाणे, कीटकनाशके शेतकऱ्यांच्या बांधावर करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याच माध्यमातून आतापर्यंत एक ते दोन टक्के बियाणे पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये गती वाढविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरीही आतापर्यंत आठ ते नऊ टक्के बियाणे, खते विक्री करण्यात आली.

 

Web Title: 43.84 lakh Bt cotton packets arrived!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.