‘लेक शिकवा’ अभियानासाठी ४३४ शाळा!
By Admin | Updated: May 27, 2017 00:46 IST2017-05-27T00:46:49+5:302017-05-27T00:46:49+5:30
मुलींची गळती रोखण्यासाठी प्रयत्न: शिक्षण विभाग राबविणार अभियान

‘लेक शिकवा’ अभियानासाठी ४३४ शाळा!
नितीन गव्हाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शिक्षण विभागाच्या वतीने येत्या शैक्षणिक सत्रापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान जिल्ह्यातील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ४३४ शाळा टार्गेट करण्यात आल्या असून, या शाळांमध्ये हे अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
इंग्रजी शाळांकडे वाढलेला पालकांचा ओढा, जिल्हा परिषद शाळांना लागलेली विद्यार्थ्यांची गळती पाहता, शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान सुरू केले आहे. विशेषत: ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांविषयी आकर्षण वाढले असून, आपली मुले-मुली दर्जेदार इंग्रजी शाळांमध्ये शिकविण्यासाठी पालक धडपड करताना दिसून येतात. त्यातही जिल्हा परिषद शाळांमधील मुलींची संख्या दिवसेंदिवस घसरत आहे. सोबतच गरीब परिस्थितीमुळे अनेक मुलींना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. जिल्हा परिषद शाळांमधील मुलींची संख्या कमी होऊ नये, या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ४३४ शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थिनींना शिक्षण घेता यावे, त्यांनी शाळा सोडू नये, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थिनी शिक्षणापासून दूर जाऊ नयेत, म्हणून शासनाने विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्त्यासोबतच सायकल भेट, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेशसाठी अनुदानसारख्या योजना सुरू केल्या आहेत. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिनींना या सर्व योजनांचा लाभ देण्यात येऊन त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळा निश्चित करून त्या शाळांमध्ये लेक शिकवा अभियान राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिनींची होणारी कमी संख्या पाहता, शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्याची गरज आहे. या अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा विद्यार्थिनींना लाभ देऊन त्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचाविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
- प्रकाश मुकुंद
शिक्षणाधिकारी, माध्यमिक