शिष्यवृत्तीचे ४,२५५ अर्ज महाविद्यालयांमध्ये प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 14:28 IST2022-05-09T14:28:00+5:302022-05-09T14:28:07+5:30
Scholarship applications pending in colleges : ४,२५५ शिष्यवृत्ती आवेदनपत्र विविध महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.

शिष्यवृत्तीचे ४,२५५ अर्ज महाविद्यालयांमध्ये प्रलंबित
अकोला : माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या महाडीबीटी पोर्टलवरून सामाजिक न्याय विभाग व विजाभज, विमाप्र कल्याण विभागाच्या पोस्ट मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत झालेल्या अनुसूचित जाती व विजाभज,इमाव प्रवर्गातील ४,२५५ शिष्यवृत्ती आवेदनपत्र विविध महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.
महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरिता विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने,राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना व व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना राबविण्यात येत आहे. या योजनेकरिता माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता नवीन व नूतनीकरण अर्ज भरण्याची सुविधा १४ डिसेंबर २०२१ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १७,५४२ तर विजाभज,इमाव व विमाप्र प्रवर्गातील २५,८६७ आवेदन पत्रे नोंदणीकृत झालेली आहे. नोंदणीकृत झालेल्या अर्जांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील १३,७५० तर विजाभज,इमाव व विमाप्र प्रवर्गातील २१,७५८ स्तरावर निकाली काढण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील १९९५ तर विजाभज,इमाव व विमाप्र प्रवर्गातील २२६६ शिष्यवृत्ती आवेदनपत्र विविध महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहे. याकरिता संबंधित महाविद्यालयांना वेळोवेळी विविध माध्यमाद्वारे सूचना देण्यात आले.
अर्ज निकाली काढण्याच्या सूचना
प्रलंबित अर्ज महाविद्यालय स्तरावर तातडीने निकाली काढावे,अशा सूचना समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी दिल्या आहेत. प्रलंबित अर्जाची शासन निर्णयानुसार पडताळणी करून पात्र अर्ज जिल्हा कार्यालयाच्या लॉगिनवर पाठविण्यात यावे. तसेच ज्या महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क अद्यापही मंजूर झालेले नाही असे महाविद्यालयांनी शुल्क मंजुरीची कार्यवाही जलद गतीने करावी. पात्र मागासवर्गीय विद्यार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,असे समाजकल्याण कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.