४२ शाळांमधील दुष्काळग्रस्त विद्यार्थी धनादेशापासून वंचित!
By Admin | Updated: April 26, 2017 01:32 IST2017-04-26T01:32:57+5:302017-04-26T01:32:57+5:30
विद्यार्थ्यांचे नुकसान: शिक्षण विभागाने सूचना देऊनही शाळांनी नेले नाहीत धनादेश

४२ शाळांमधील दुष्काळग्रस्त विद्यार्थी धनादेशापासून वंचित!
अकोला : दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचे मार्च, एप्रिल २०१६ मध्ये परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त भागातील २,३८८ विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांचे धनादेशसुद्धा तयार केले; परंतु जिल्ह्यातील ४२ शाळांनी शिक्षण विभागाकडून अद्यापपर्यंत शिक्षण विभागाकडून धनादेश नेलेच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या शाळांमधील शेकडो विद्यार्थी धनादेशापासून वंचित आहेत.
२०१६ मध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळी वातावरण होते. शेतातील पिके बुडाली. शेतकरी व त्यांच्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे झाले होते. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने जिल्ह्यात काही भाग दुष्काळग्रस्त जाहीर केले आणि दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे दहावी व बारावीचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला; परंतु तोपर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केला होता. त्यामुळे हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचा आदेश शिक्षण विभागाला देण्यात आला. शिक्षण विभागाने शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्यांना पत्र पाठवून शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांच्या बँक खात्यांची माहिती मागविली होती; परंतु अनेक शाळा, महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती नसल्यामुळे अडचणी येत होत्या; परंतु शिक्षण विभागाने सातत्याने विद्यार्थ्यांची माहिती मागविल्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या बँक खात्याचे क्रमांक मिळविले आणि शिक्षण विभागाकडे सादर केले.
शिक्षण विभागाकडे आलेल्या माहितीनुसार, २३०६ विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांचे धनादेश तयार केले आणि जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे धनादेश शिक्षण विभागाकडून प्राप्त करून घेण्यास सांगितले.
धनादेशाची तारीखही गेली!
जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयांनी वारंवार सूचना दिल्यानंतर शाळांनी धनादेश घेतले; परंतु अद्यापही जिल्ह्यातील ४२ शाळांनी विद्यार्थ्यांचे धनादेश प्राप्त करून घेतले नाही, त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांना धनादेशापासून वंचित राहावे लागत आहे. शाळांच्या दुर्लक्षामुळे धनादेशाची तारीखसुद्धा निघून गेली आहे.