खरीप पिकांची पैसेवारी ४१ पैसे
By Admin | Updated: November 16, 2014 01:50 IST2014-11-16T01:03:18+5:302014-11-16T01:50:08+5:30
अकोला जिल्हाधिका-यांनी जाहीर केली सुधारित पैसेवारी, शासनाकडून शेतक-यांना मिळणा-या सवलतींचा मार्ग आता मोकळा.

खरीप पिकांची पैसेवारी ४१ पैसे
अकोला: यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची सरासरी पैसेवारी ४१ पैसे आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात अल्प पाऊस झाल्याने, यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात मूग, उडीद या पिकांचे उत्पादन काहीच झाले नाही. तसेच सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. एकरी ५0 किलो ते एक क्विंटल सोयाबीन पिकाचे उत्पादन झाले. खरीप पिकांचे उत्पादन हातून गेल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. दरम्यान, प्रत्यक्ष पीक कापणीच्या आधारे, जिल्ह्यातील खरीप पिकांच्या सुधारित पैसेवारीचे अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिले होते. तहसीलदरांकडून, प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी शनिवार, १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाश्रीटाकळी, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील लागवडयोग्य ९९७ गावांमधील खरीप पिकांची सुधारित सरासरी पैसेवारी ४१ पैसे म्हणजेच ५0 पैशांच्या आत आहे. ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्याचा समावेश टंचाईसदृश जिल्ह्यांमध्ये केला जातो. तसेच शासनाकडून शेतकर्यांसाठी विविध सवलती जाहीर केल्या जातात. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, शासनाकडून शेतकर्यांना मिळणार्या सवलतींचा मार्ग आता मोकळा झाला आहे.