अकोला परिमंडळात ३३ हजार नवीन वीज जोडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 11:02 IST2021-04-04T11:01:58+5:302021-04-04T11:02:07+5:30
MSEDCL News, power connections in Akola Zone : सर्व वर्गवारीतील ३३ हजार ५४ ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या.

अकोला परिमंडळात ३३ हजार नवीन वीज जोडण्या
अकोला : कोरोना विषाणू महामारीच्या काळातदेखील महावितरणकडून ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा सुरळीत व अविरतपणे देण्यात येत आहे. गेल्या आर्थिक वर्षात अकोला परिमंडलअंतर्गत सर्व वर्गवारीतील ३३ हजार ५४ ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. महावितरणकडून दरवर्षी मागणीनुसार साधारणतः राज्यात ९ ते १० लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मागील वर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याचा वेग मंदावला होता. तरीही इतर वीज सेवांप्रमाणेच नवीन वीजजोडणी देण्याच्या कामात कोणताही खंड पडला नाही.
अकोला परिमंडलअंतर्गत विविध वर्गवारीतील ग्राहकांना देण्यात आलेल्या नवीन वीज जोडण्यामध्ये अकोला जिल्ह्यातील ११,३५७ ग्राहकांचा, बुलडाणा जिल्ह्यातील १३,४६१ ग्राहकांचा, तर वाशिम जिल्ह्यातील ८२३६ ग्राहकांचा समावेश आहे.
राज्यात ८ लाखांवर वीजजोडण्या
याच काळात राज्यात तब्बल ८ लाख २ हजार ७८२ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. कोकण प्रादेशिक विभागामध्ये २ लाख ८५ हजार ३३२, तर पुणे प्रादेशिक विभाग- २ लाख २८ हजार ६९३, नागपूर प्रादेशिक विभाग - १ लाख ६५ हजार १८१ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागामध्ये १ लाख २३ हजार ५७१ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.