२४ तास कामाचा व्याप; कर्तव्य बजावताना कुटुंबाचीही मिळते भक्कम साथ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:38+5:302021-05-15T04:17:38+5:30
अकोला : दैनंदिन प्रशासकीय कामासोबतच कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या समस्या व अडचणींचे निवारण करताना ...

२४ तास कामाचा व्याप; कर्तव्य बजावताना कुटुंबाचीही मिळते भक्कम साथ!
अकोला : दैनंदिन प्रशासकीय कामासोबतच कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या समस्या व अडचणींचे निवारण करताना सद्य:स्थितीत रात्रंदिवस काम करावे लागत आहे. २४ तास कामाचा व्याप असल्याने कुटुंबाला देण्यासाठी वेळ अपुरा पडत असला तरी, कर्तव्य बजावताना कुटुंबाचीही भक्कम साथ मिळत असल्याचे मत अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केले.
कोरोना काळात जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित यंत्रणांच्या बैठका घ्याव्या लागतात. यासोबतच दैनंदिन प्रशासकीय कामे मार्गी लावण्यासोबतच लोकप्रतिनिधी आणि विविध यंत्रणांसोबत समन्वय ठेवावा लागतो. शासनाचे निर्णय, आदेश, मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करतानाच जिल्ह्यातील जनतेच्या भेटीसाठीही वेळ द्यावा लागतो. याशिवाय जिल्ह्यातील वेगवेगळ्या समस्या आणि अडचणींचे निवारण करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांना करावे लागते. कोरोना काळात कामकाज करताना रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत कार्यालयातच वेळ जातो. त्यानंतर महत्त्वाच्या आणि तातडीच्या कामांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय आणि फाइल्स घरीचच हाताळाव्या लागतात. जिल्हाधिकारी म्हणून जनतेशी निगडित पदावर काम करताना कोरोना काळात ‘दिवस असो की रात्र’ वेगवेगळ्या समस्या आणि अडचणींचे निवारण करण्याचे काम करावे लागते. २४ तास कामाच्या व्यस्ततेत कुटुंबाला पाहिजे तेवढा वेळ देणे शक्य हाेत नाही. मात्र, कर्तव्य बजावताना मिळेल तेवढा वेळ कुटुंबासोबत घालविण्याचा प्रयत्न असतो. कामाच्या व्यापात कुटुंबियांसोबत शेअर करण्यासाठी अत्यल्प वेळ मिळत असला तरी, कर्तव्य बजावण्याच्या कामात कुटुंबाची भक्कम साथ मिळते, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
कोरोना संकटाच्या काळात जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र पापळकर यांना कामाचा मोठा व्याप आहे. दिवस असो की रात्र साहेब कामात व्यस्त असतात. त्यामुळे आम्हा कुटुंबियांना त्यांची काळजी वाटते. मात्र, कामाचा कितीही व्याप असला तरी, ते घरी कुटुंबियांना जाणवू देत नाहीत. प्रशासकीय कामात कितीही संकटे आली तरी ते शांतपणे आपले कर्तव्य पूर्ण करतात. जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना मिळालेला वेळ कुटुंबियांसाठी देतात, त्याचा आम्हाला अभिमान आहे.
साै. सुप्रिया जितेंद्र पापळकर
रात्रीच्या वेळीही उपचार सुविधांच्या
अडचणी निवारणाचे काम!
कोरोना काळात जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात येतो, तसेच आरोग्य आणि उपचार सुविधांसंदर्भात संबंधित यंत्रणांसोबत समन्वय ठेवून आवश्यक त्या उपाययोजनांसंदर्भात निर्देश दिले जातात, तसेच रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर इंजेक्शन, व्हेंटिलेटर बेड आदी उपचार सुविधांबाबत अडचणी निवारणाचे काम सुरू असते, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
........................फोटो.........................