‘दुरोंतो’मध्ये आता मिळणार २४ तास आरोग्य सुविधा

By Admin | Updated: December 12, 2014 00:22 IST2014-12-12T00:22:32+5:302014-12-12T00:22:32+5:30

हावडा-मुंबई एक्सप्रेसमध्ये प्रायोगिक तत्वावर सुविधा.

24 Hours of Healthcare will now be available in 'Durante' | ‘दुरोंतो’मध्ये आता मिळणार २४ तास आरोग्य सुविधा

‘दुरोंतो’मध्ये आता मिळणार २४ तास आरोग्य सुविधा

राम देशपांडे/अकोला
दुरोंतो एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये लवकरच २४ तास आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, पहिल्या टप्प्यात हावडा-मुंबई दुरोंतो एक्सप्रेसमध्ये (१२२६२/१२२६१) ही सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू केली जाणार आहे. त्यासाठी नेमलेल्या चमूमध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ आणि परिचारिका २४ तास उपलब्ध राहणार आहे.
इतर प्रवासी गाड्यांप्रमाणे दुरोंतो एक्सप्रेस प्रत्येक स्थानकावर थांबत नाही. केवळ ठराविक रेल्वे स्थानकांवरच या गाड्या थांबत असल्याने, दुरोंतोच्या प्रवाशांना आरोग्य सुविधेची गरज भासल्यास ती मिळण्यास वेळ लागू शकतो. अशावेळी एखाद्या प्रवाशाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार करून, देशातील सर्व विभागांमध्ये लांब पल्ल्यासाठी सुरू करण्यात आलेल्या दुरोंतो एक्सप्रेसमध्ये २४ तास आरोग्य सुविधा पुरविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. देशभरात वेगवेगळय़ा ६२ मार्गांवर दुरोंतो एक्सप्रेस गाड्या धावतात. या गाड्यांमध्ये आरोग्य सुविधा उपल्बध करून देण्यास रेल्वे बोर्डाची मंजुरातही मिळाली आहे. त्यामुळे या एक्सप्रेसच्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
 

Web Title: 24 Hours of Healthcare will now be available in 'Durante'