23 patients with post covid 'fibrosis'! | पोस्ट कोविडच्या २३ रुग्णांना ‘फायब्रोसिस’!

पोस्ट कोविडच्या २३ रुग्णांना ‘फायब्रोसिस’!

अकोला : कोरोनातून बरे झाल्यानंतरही फुप्फुसांशी निगडित समस्यांचा धोका कायम आहे. आतापर्यंत सर्वोपचार रुग्णालयातील पोस्ट कोविड वॉर्डात अशाच ४० जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २३ रुग्णांना ‘फायब्रोसिस’ झाल्याचे समोर आले. या रुग्णांवर औषधोपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तज्ज्ञांच्या मते, वयस्क नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक आरोग्यविषयक तक्रारी समोर येतात. फुप्फुस, हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्याने अनेकांना चालताना थकवा जाणवतो. हृदयाचे ठोके वाढतात, काहींचे वजनही कमी होते. अशा लक्षणांचे रुग्ण सर्वोपचारच्या पोस्ट कोविड वाॅर्डात उपचारासाठी येत आहेत. मागील नऊ महिन्यांत सर्वोपचार रुग्णालयातील पोस्ट कोविड वॉर्डात ४० रुग्णांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यापैकी २३ रुग्णांमध्ये ‘फायब्रोसिस’शी निगडित समस्या असल्याचे समोर आले. या रुग्णांवर योग्य औषधोपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे शासकीय किंवा आपल्या खासगी डाॅक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले.

 

यांनी घ्यावी विशेष खबरदारी

फुप्फुस, हृदयाशी संबंधित किंवा इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त असणारे रुग्ण, वयस्क रुग्णांना कोरोनाच्या संसर्गात गंभीर स्वरूपाची लक्षणे असल्यास अशांच्या फुप्फुसावर परिणाम झालेला दिसतो. अनेकांच्या फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे अशा रुग्णांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

फुप्फुसाच्या फायब्रोसिसशी संबंधित लक्षणे आढळून येत आहेत. अनेक रुग्णांमध्ये चालताना थकवा येणे, धाप लागणे, अशक्तपणा जाणवणे, श्वास घेताना त्रास होणे, चक्कर येणे, फुप्फुसात दाह होणे यासारखी लक्षणे आढळत असल्याने त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

कोरोनातून बरे झाले असाल, तरी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. थकवा येणे, धाप लागणे यासह इतर लक्षणे दिसताच सर्वोपचार रुग्णालयातील पोस्ट कोविड वॉर्डात भेट देऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

-डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Web Title: 23 patients with post covid 'fibrosis'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.