२२१ दारू दुकानांना आजपासून लागणार टाळे !
By Admin | Updated: April 1, 2017 03:10 IST2017-04-01T03:10:32+5:302017-04-01T03:10:32+5:30
काटेकोर अंमलबजावणी होणार; जिल्हय़ातून जाणा-या राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दुकानांना फटका.

२२१ दारू दुकानांना आजपासून लागणार टाळे !
अकोला, दि. ३१- राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर ठरावीक अंतराचा निकष निर्धारित करुन सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दारू विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश दिला. त्यामुळे आता जिल्हय़ातील २२१ देशी, विदेशी दारूची दुकाने, वाइन बार, बीअर शॉपी बंद होणार आहेत. शनिवारपासून ही सर्व दुकाने कायमस्वरूपी बंद होतील. त्यामुळे लिकर लॉबीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील दारूची दुकाने, वाइन बारमुळे वाहनचालक दारू प्राशन करतात आणि त्यामुळे अपघात घडुन नागरिकांना नाहक बळी जावे लागते. असे निरिक्षण नोंदवित सर्वोच्च न्यायालयाने वाइन बार, वाइन शॉप, बीअर शॉपी हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे १ एप्रिलपासून या दुकानांचे नूतनीकरण करण्यात येऊ नये, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले होते. त्या दृष्टिकोनातून राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा प्रशासन कामाला लागले आहेत. १ एप्रिलपासून आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्याने दिली. या निर्णयामुळे जिल्हय़ातील २५0 दारूच्या परवान्यांपैकी २२१ परवाने उद्यापासून बंद होणार आहेत. केवळ २९ परवाने कायम राहतील. शहरातून राष्ट्रीय महामार्गासोबतच अनेक राज्य महामार्गसुद्धा जात असल्यामुळे या मार्गांवरील दारूच्या दुकानांची परवाने रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे आता दारू विक्री न करता, हॉटेल, ढापेमालक, रेस्टॉरंट चालकांना केवळ भोजन, खाद्यपदार्थ विक्री करता येणार आहे. एवढेच नाही, तर या प्रतिष्ठानांमधील व्यवहारांवरही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष राहणार आहे.
या मार्गांवर दारूबंदी
राष्ट्रीय महामार्गासह, अकोट रोड, दर्यापूर रोड, वाशिम रोड, शेगाव रोड, बाश्रीटाकळी रोडसह शहरातील टिळक रोड, उमरी रोड, बाळापूर रोड, रेल्वे स्टेशन, गांधी रोड, सिव्हिल लाइन रोड आदी ठिकाणची देशी, विदेशी, बार, बीअर शॉपी बंद होतील.
निवास व्यवस्था असलेल्या हॉटेलमधील स्टॉकरूमला सील
१ एप्रिलपासून जिल्हय़ातील २२१ दारू दुकाने, बार बंद होती; परंतु या ठिकाणी असलेला मोठय़ा प्रमाणातील स्टॉकची बाहेर किंवा आत विक्री होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सर्वच दारू दुकाने, बार आणि निवासी हॉटेलमधील स्टॉकरूमला सील लावण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील निवास व्यवस्था असलेल्या हॉटेलपैकी सिटी स्पोर्ट्स क्लब, जसनागरा, ग्रीनलॅन्ड कॉटेजमधील परमिट रूम बंद होतील.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हय़ातील २५0 पैकी २२१ देशी, विदेशी दारू दुकाने, बार, बीअर, वाइन शॉपी आणि हॉटेलमधील परमिट रूमची परवाने रद्द झाली आहेत. त्यामुळे या ठिकाणी दारू विक्रीस पूर्णत: बंद राहणार आहे. स्टॉकरूम सील करण्यात येणार आहेत. दरम्यान, कुणी दारू विक्री करताना मिळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
- राजेश कावळे, अधीक्षक,
राज्य उत्पादन शुल्क.