महान धरणात २१ टक्के जलसाठा

By Admin | Updated: July 20, 2014 01:59 IST2014-07-20T01:32:48+5:302014-07-20T01:59:56+5:30

जलशुद्धीकरण केंद्रातून अकोला शहराला प्रतितास साडेचोवीस लाख लीटर्स पाणीपुरवठा.

21 percent water storage in the Great Dam | महान धरणात २१ टक्के जलसाठा

महान धरणात २१ टक्के जलसाठा

महान: पावसाने मारलेली दडी, बाष्पीभवनाचा वेग व सातत्याने होत असलेला उपसा या कारणांमुळे महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने घटत असून, आजरोजी या धरणात केवळ २१ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. दरम्यान, येथील दोन जलशुद्धीकरण केंद्रांमधून केवळ अकोला शहरासाठी प्रतितास साडेचोवीस लाख लीटर्स पाणीपुरवठा केला जात आहे.
महान येथील जुन्या जलशुद्धीकरण केंद्रातील २५ एम. एल.डी. च्या ३ पंपांपैकी १, तर नव्या केंद्रातील ६५ एम. एल. डी. च्या ५ पंपांपैकी २ अशा एकूण तीन पंपांमधून अकोल्यासाठी प्रतितास साडेचोवीस लाख लीटर्स पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या धरणाची पातळी खालावल्याने गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रात निर्जंतुकीकरण करण्यासाठी या पाण्यात क्लोरीन वायूची १५ ते २0 पी.पी.एम. घुसळण केली जात आहे. दमदार पावसाअभावी या वर्षी धरणाची पातळी वाढली नाही तर महानगर पालिकेला ११ वर्षांपूर्वीचा प्रयोग राबवावा लागणार आहे. अकरा वर्षांपूर्वी या धरणातील चार व्हॉल्व उघडे पडल्याने धरणातील खालून दुसर्‍या क्रमांकाचा व्हॉल्व उघडून दहा अश्‍वशक्तीच्या पाच पंपांनी उपसा करून शहराला पाणीपुरवठा केला होता. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही दमदार पाऊस न झाल्याने धरणाच्या पातळीत किंचीतही वाढ झालेली नाही. त्यामुळे अकोलेकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. गतवर्षी २0 जुलै रोजी महान धरणाची पातळी ८0.८३ टक्क्यांच्या वर गेल्याने जलाशयाचे दोन वक्रद्वार १५ से.मी.ने उघडण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेत आजरोजी या धरणातील पाणी पातळी तब्बल ६0 टक्के कमी आहे.

Web Title: 21 percent water storage in the Great Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.