2007 persons were sheltered in Akola district | अकोला जिल्ह्यात २००७ जणांना आसरा

अकोला जिल्ह्यात २००७ जणांना आसरा

ठळक मुद्देअडकले वा प्रवासात राहिले, ते सारे अकोला जिल्ह्याच्या आश्रयात आले. शासन त्यांना निवास, भोजन आदी दैनंदिन सुविधा देत आहे.

अकोला : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबविताना जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’मुळे आपापल्या गावी न जाऊ शकलेले श्रमिक, कामगार मोठ्या संख्येने अडकले वा प्रवासात राहिले, ते सारे अकोला जिल्ह्याच्या आश्रयात आले. सध्या २,००७ इतक्या संख्येने हे श्रमिक अकोला जिल्ह्यात आश्रयस्थानी आहेत. शासन त्यांना निवास, भोजन आदी दैनंदिन सुविधा देत आहे.
हैदराबाद येथून २४ मार्चपासून मजल दरमजल करीत सुमारे ६० कामगारांचा एक जत्था मध्यप्रदेशातील मुरेना जिल्ह्याकडे जात होता. अकोला जिल्ह्याच्या सीमेवर सीमाबंदी असल्याने त्यांना २९ मार्चला पातूर येथे अडविण्यात आले. तेथून त्यांना अकोला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन येथे स्थलांतरित करण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिकाणी आश्रयाला असलेल्यांची ठिकाणांसह माहिती याप्रमाणे कंसात आश्रितांची संख्या दिली आहे. सध्या एकट्या अकोला शहरात खडकी (३२७), डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन (६०), शिवणी शिवार (२८), निरघाट (१७०), उगवा (१३०), दहीहंडा (५५), भारीखेड (४९), डाळंबी (३४), चांडक लेआउट, खडकी (६८), दोंदवाडा (४४), अष्टविनायक नगर, खडकी (२७), गोरेगाव खुर्द (२२), माझोड (२१), महसूल कॉलनी, खडकी (२१), कोठारी वाटिका (२०), अग्रवाल शेल्टर हाऊस (६५) या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कान्हेरी सरप, ता. बार्शीटाकळी, कंपनी शेल्टर हिवरखेड, ता. अकोट (२८३), तेल्हारा (२७०), रिधोरा, ता. बाळापूर (५१), नगरपालिका हॉल, पातूर (५१), गुरुद्वारा लंगर पारस फाटा, ता. बाळापूर (२२), राठोड माध्यमिक विद्यालय, दहातोंडा, ता. मूर्तिजापूर (१२०), मूर्तिजापूर (३८) असे एकूण २००७ जणांच्या आश्रयाची व्यवस्था करण्यात आली आहे.


परराज्यातील मजुरांही मोठी संख्या
जिह्यात आश्रयाला असलेल्या मजुरांमध्ये १२२ आंध्र प्रदेशातील, ४७ बिहार, ६ छत्तीसगड, ८० गुजरात, ९७ झारखंड, ५० केरळ, ११०९ मध्यप्रदेश, ५ पंजाब, ६५ राजस्थान, ५३ तामिळनाडू, २०२ तेलंगाणा, ४९ उत्तरप्रदेश, एक उत्तराखंड, १ पश्चिम बंगाल, १२० हे महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील आहेत.


 
या आहेत सुविधा
या सर्व जणांना राहण्याची सोय, सकाळी शौचालय, आंघोळीची सोय, पिण्याचे पाणी, दोन वेळचे जेवण तसेच आवश्यकता भासल्यास वैद्यकीय तपासणी व उपचार, आपल्या गावाकडील कुटुंबीयांशी संपकार्साठी दूरसंचार सुविधा या सुविधा दिल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाने काही ठिकाणी कम्युनिटी किचनद्वारे तर काही ठिकाणी सेवाभावी संस्थांद्वारे जेवणाची सोय केली आहे. येथे त्यांच्यासाठी उत्तम निवास, झोपण्याची सुविधा, पाणी, दिवाबत्ती इतकेच नव्हे तर हे श्रमिक मिळेल तसे निघाले असल्याने अनेकांकडे कपडेही नव्हते, तर त्यांना येथे कपडेही देण्यात आले. या शिवाय दैनंदिन लागणाऱ्या वस्तू जसे टुथपेस्ट, ब्रश, साबण, डोक्याला लावण्याचे तेल इ. सर्व साहित्यही पुरविण्यात आले. सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना या भवनात ठेवण्यात आले आहे.

कोरोना विषाणू संसर्गास प्रतिबंध घालावा या एकमेव हेतूने त्यांना येथे अडवण्यात आले. येथे ते अडविण्यात आले ते कुणी गुन्हेगार म्हणून नाही तर आश्रित म्हणून. त्या साऱ्यांची जबाबदारी ही प्रशासनाने घेतली.

-जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी

 

Web Title: 2007 persons were sheltered in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.