२० लाखांचा गुटख्याचा साठा जप्त
By Admin | Updated: June 13, 2017 00:40 IST2017-06-13T00:40:10+5:302017-06-13T00:40:10+5:30
विशेष पथक आणि वाहतूक शाखेची कारवाई

२० लाखांचा गुटख्याचा साठा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा मोठा साठा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी पहाटे तीन ठिकाणी छापेमारी करून पकडला. त्यानंतर वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलिसांनी एका कारमधून नेण्यात येत असलेला ५ लाखांचा गुटखा साठा जप्त केला आहे. तब्बल २० लाख रुपयांचा गुटख्याचा साठा पोलिसांनी पकडल्याने अग्रवाल नामक गुटखा माफिया पोलिसांवरही शिरजोर झाल्याचे बोलल्या जात आहे.
रजपूतपुरा येथील रहिवासी तथा गुटखा माफिया घनश्याम सीताराम अग्रवाल (६२) आणि चमन सीताराम अग्रवाल (४९) तसेच जवाहर नगरातील चंद्रनारायण लालचंद अग्रवाल या तिघांचे किराणा बाजारात अंबिका पानमसाला, जगदंबा सुपारी स्टोअर्स आणि भगवती सुपारी स्टोअर्समधून प्रतिबंधित गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी या माहितीच्या आधारे रविवारी रात्रीपासून ते सोमवारी पहाटेपर्यंत किराणा बाजारात सापळा रचला. तीनही दुकानांमध्ये तब्बल १५ लाख रुपयांचा गुटखा साठा असल्याने निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सोमवारी पहाटे पथकासह या तीनही दुकानात छापेमारी केली. काही वेळातच तब्बल १५ लाख रुपयांचा गुटखा हर्षराज अळसपुरे यांनी जप्त केला. त्यानंतर सदर गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
घनश्याम अग्रवाल हा जिल्ह्यातील सर्वात मोठा गुटखा माफिया असल्याचे समोर आले असून, १५ दिवसांच्या कालावधीत विशेष पथकाने त्याच्याकडून तब्बल २५ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. त्यानंतर वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात सोमवारी वाहनांचे दस्तावेज तपासणी सुरू असताना एका कारची तपासणी केली असता यामधूनही तब्बल ५ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा वाहतूक पोलिसांनी जप्त केला. विशेष पथकाचे प्रमुख अळसपुरे आणि वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी गुटख्याचा मोठा साठा पकडल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.
घनश्याम अग्रवालसह तिघांना समजपत्र
गुटखा माफिया घनश्याम अग्रवालसह तीनही अग्रवाल गुटखा माफियांना विशेष पथकाचे प्रमुख अळसपुरे यांनी समजपत्र दिल्याची माहिती आहे. यानंतर गुटखा विक्री किंवा खरेदी केल्यास घनश्याम अग्रवालसह तिघांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची तंबी गुटखा माफियांना व त्याच्या साथीदारांनी पोलिसांनी दिली आहे.