२0 दिवस, ६१ हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:26 IST2017-08-26T01:26:26+5:302017-08-26T01:26:38+5:30

कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन ’अर्ज भरून घेण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. २४ ऑगस्टपर्यंत जिल्हय़ातील केवळ १0 हजार ६ थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. त्यामुळे जिल्हय़ातील उर्वरित ६१ हजारांपेक्षा जास्त थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज वीस दिवसांत भरण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.

20 days, 61 thousand farmers | २0 दिवस, ६१ हजार शेतकरी

२0 दिवस, ६१ हजार शेतकरी

ठळक मुद्देकर्जमाफीसाठी ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे आव्हान आतापर्यंत केवळ १0 हजार शेतकर्‍यांचे अर्ज अपलोड

संतोष येलकर । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन ’अर्ज भरून घेण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. २४ ऑगस्टपर्यंत जिल्हय़ातील केवळ १0 हजार ६ थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. त्यामुळे जिल्हय़ातील उर्वरित ६१ हजारांपेक्षा जास्त थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज वीस दिवसांत भरण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्‍यांना शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्याची प्रक्रिया जिल्हय़ातील  महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर गत २४ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. वारंवार ‘सर्व्हर डाउन’ होणे, नेट कनेक्टिव्हिटीअभावी ऑनलाइन अर्ज भरण्याची ‘आपले सरकार’ वेबसाइट वारंवार बंद पडणे व इतर कारणांमुळे शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे जिल्हय़ातील ७१ हजार ३७९ थकबाकीदार शेतकर्‍यांपैकी २४ ऑगस्टपर्यंत केवळ १0 हजार ६ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले आहेत. कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ातील उर्वरित ६१ हजार ३७३ थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया वीस दिवसांच्या कालावधीत पूर्ण होणार की नाही, याबाबतचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.

अर्ज भरण्याचे काम जलदगतीने करा; जिल्हाधिकार्‍यांचा तहसीलदारांना आदेश!
तहसील कार्यालयात अतिरिक्त संगणक संच बसवून शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचे काम जलदगतीने करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी जिल्हय़ातील तहसीलदारांना दिला आहे. तसेच कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जाचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारांना दिले.

कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना ‘नेट कनेक्टिव्हिटी’ वारंवार बंद पडत असल्याने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अर्ज न भरताच शेतकर्‍यांना परत जावे लागत असल्याची परिस्थिती आहे. जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम १५ सप्टेंबरपर्यंंत पूर्ण होणे शक्य नाही.
-मनोज तायडे,
अध्यक्ष, शेतकरी जागर मंच, अकोला.

Web Title: 20 days, 61 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.