महिलेच्या पोटात निघाला १८ सेंमी लांबीचा अपेंडिक्स
By Admin | Updated: October 18, 2014 00:02 IST2014-10-18T00:02:21+5:302014-10-18T00:02:21+5:30
बुलडाण्यात यशस्वी शस्त्रक्रिया; डॉक्टरांचे अडीच तास शर्थीचे प्रयत्न.

महिलेच्या पोटात निघाला १८ सेंमी लांबीचा अपेंडिक्स
बुलडाणा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एका महिलेच्या पोटातून १८.५ से.मी. लांबीचा अपेंडिक्स काढण्यात आला. रशीदा बी गणी खाँ असे या महिला रुग्णाचे नाव असून, देशातील दुसर्या क्रमांकाची तर जगातील तिसर्या क्रमांकाची ही शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. यापूर्वी मुंबई येथील एका खाजगी रुग्णालयात एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्या पोटात तब्बल २0.५ से.मी. लांबीचा अपेंडिक्स निघाला होता. तो देशातील सर्वाधिक लांबीचा अपेंडिक्स होता. अमेरिकेमध्ये तर एका रुग्णाच्या पोटात २६ से.मी. लांबीचा अपेंडिक्स निघाल्याची नोंद आहे. तो जगात सर्वाधिक लांबीचा होता. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. प्रशांत राठोड यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. तीन दिवसांपूर्वी रशिदाबीेच्या पोटात दुखत होते. म्हणून ती जिल्हा सामान्य रुग्णालया त आली. डॉ. प्रशांत राठोड यांनी तिची तपासणी केल्यानंतर तिच्या पोटात अपेंडिक्स असल्याचे निदान केले आणि शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ठरल्यानुसार ११ ऑ क्टोबरला तिला शस्त्रक्रिया करण्यासाठी आणले असता, या महिलेच्या पोटात नेहमीपेक्षा मोठा अपेंडिक्स असल्याचे डॉ. राठोड यांच्या लक्षात आले. यांनी अत्यंत काळजीपूर्वक, तेवढीच आव्हानात्मक असलेली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून अपेंडिक्स बाहेर काढला. तो चक्क १८.५ सें.मी. निघाला. ही शस्त्रक्रिया तब्बल अडीच तास चालली. या अवघड शस्त्रक्रियेसाठी डॉ. प्रशांत राठोड भूलतज्ज्ञ डॉ. उंबरकर व इतरांनी सहकार्य केले. अपेंडिक्स मोठा असल्याने तो लिव्हरकडे वळला होता. त्यामुळे अपेंडिक्स बाहेर काढणे हे आव्हानच होते, असे जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. प्रशांत राठोड यांनी स्पष्ट केले.