मूर्तिजापूर पंचायत समितीत अधिकारी, कर्मचा-यांची १७ पदे रिक्त
By Admin | Updated: December 10, 2014 01:29 IST2014-12-10T01:29:37+5:302014-12-10T01:29:37+5:30
शिक्षण विस्तार अधिका-याअभावी शिक्षणाचा खेळखंडोबा : शाखा अभियंता प्रतिनियुक्तीवर.

मूर्तिजापूर पंचायत समितीत अधिकारी, कर्मचा-यांची १७ पदे रिक्त
दीपक अग्रवाल / मूर्तिजापूर (अकोला)
पंचायत राज व्यवस्थेत महत्त्वाचा घटक मानल्या जाणार्या पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचार्यांची सर्व पदे भरलेली असणे कामकाज सुरळीतपणे होण्याच्या दृष्टीने आवश्यक असते. परंतु, मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचार्यांची तब्बल १७ पदे रिक्त अहेत. त्याचा विकासकामांना फटका बसत आहे.
पंचायत राज व्यवस्थेत तालुक्याच्या विकासाची जबाबदारी पंचायत समितीकडे देण्यात आलेली आहे. मूर्तिजापूर पंचायत समितीमध्य अधिकारी व कर्मचार्यांचे २४ संवर्ग असून, ७३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५६ पदे भरलेली आहेत; परंतु चार संवर्गातील अधिकारी व कर्मचार्यांना प्रतिनियुक्तीवर अन्यत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे पंचायत समितीमध्ये प्रत्यक्ष कार्यरत मनुष्यबळ ५२ एवढेच आहे. ५६ पदे भरलेली असल्यामुळे १७ पदे रिक्त आहेत. पंचायत समितीमधील प्रतिनियुक्तीवर गेलेले कर्मचारी व रिक्त पदांचा परिणाम तालुक्याच्या विकासकामांवर होत आहे.
पंचायत समितीमधील मंजूर एकूण ७३ पदांपैकी ५६ पदे भरण्यात आली असल्यामुळे १७ पदे रिक्त असल्याचे दिसत असले तरी नेमकी महत्त्वाची पदेच रिक्त आहेत, हे उल्लेखनीय आहे. यात कृषी अधिकारी, शाखा अभियंता, शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी (कनिष्ठ), वरिष्ठ सहायक आदी पदांचा समावेश आहे. त्याचा पंचायत समिती अंतर्गत करण्यात येणार्या विकासकामांवर विपरीत परिणाम होत आहे.