राज्यभरात नेमले जाणार १.६३ लाख विशेष कार्यकारी अधिकारी
By Admin | Updated: March 17, 2016 02:20 IST2016-03-17T02:20:40+5:302016-03-17T02:20:40+5:30
राज्य शासनाने नियुक्तीचे निकष बदलले; दर हजार लोकसंख्येमागे होणार दोन नियुक्त्या.

राज्यभरात नेमले जाणार १.६३ लाख विशेष कार्यकारी अधिकारी
सुनील काकडे / वाशिम
एक हजार लोकसंख्येमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी, या पूर्वीच्या नियमात बदल करून, यापुढे हजार लोकसंख्येमागे दोन विशेष कार्यकारी अधिकारी नेमले जाणार आहेत. १६ जानेवारी २0१६ रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यभरात लवकरच एक लाख ६३ हजार २७८ विशेष कार्यकारी अधिकार्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
राज्य शासनाने १५ मार्च रोजी विशेष कार्यकारी अधिकार्यांच्या नियुक्तीसंदर्भातील सुधारित निकष निश्चित केले. यापूर्वी जिल्हानिहाय दर हजार लोकसंख्येमागे एक अधिकारी, याप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात पुनर्विचार करुन शासनाने आता जिल्हानिहाय दर हजार लोकसंख्येमागे दोन विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याचे निश्चित केले आहे.
१६ जानेवारी २0१६ रोजीच्या अंतीम मतदार यादीच्या आधारे राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण १ लाख ६३ हजार विशेष कार्यकारी अधिकार्यांची नेमणूक केली जाणार आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात ७ हजार ४९२, भंडारा १ हजार ८४१, गोंदिया २ हजार ९, गडचिरोली १ हजार ४३९, चंद्रपूर ३ हजार ५४७, यवतमाळ ४ हजार ४३, बुलढाणा ३ हजार ७६६, अकोला २ हजार ८४८, वाशिम १ हजार ८१४, अमरावती ४ हजार ३९५ आणि वर्धा जिल्ह्यात २ हजार १0६ विशेष कार्यकारी अधिकार्यांची नेमणूक केली जाणार आहे. दर हजार लोकसंख्येमागे २, या निकषाचे तंतोतंत पालन करुन कुठेही अधिक विशेष कार्यकारी अधिकारी नेमले जावू नयेत, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने राज्यभरातील जिल्हाधिकार्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.