जिल्ह्यात १४९ गावांत पाणीटंचाई निवारणाची १६० कामे पूर्ण !
By संतोष येलकर | Updated: May 13, 2024 20:05 IST2024-05-13T20:05:13+5:302024-05-13T20:05:23+5:30
विहिरींचे अधिग्रहण, विंधन विहिरी, कूपनलिकांची कामे.

जिल्ह्यात १४९ गावांत पाणीटंचाई निवारणाची १६० कामे पूर्ण !
अकोला : जिल्ह्यातील १४९ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांची १६० कामे ११ मे पर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये खासगी विहिरींच्या अधिग्रहणासह नवीन विंधन विहिरी, कूपनलिकांच्या कामांचा समावेश आहे. तापत्या उन्हाच्या चटक्यासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तीन महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये २३८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या विविध ५५० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांकडून प्राप्त होत असलेल्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता दिली जात आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांपैकी जिल्ह्यातील १४९ गावांमध्ये १६० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण, विंधन विहिरी, कूपनलिकांच्या कामांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.
पूर्ण केलेल्या उपाययोजनांची
अशी आहेत कामे
कूपनलिका : ८५
विंधन विहिरी : ६८
खासगी विहिरींचे अधिग्रहण : ०७
२० उपाययोजनांची कामे
लवकरच होणार सुरू
जिल्ह्यातील बाळापूर व पातूर या दोन तालुक्यांतील १९ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विंधन विहिरी व कूपनलिकांच्या २० उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ८ मे रोजी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे संबंधित उपाययोजनांची कामे लवकरच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात येणार असून, येत्या ३० मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.