पाणीटंचाई निवारणाच्या १६ कामांना मंजुरी
By Admin | Updated: April 16, 2015 01:40 IST2015-04-16T01:40:49+5:302015-04-16T01:40:49+5:30
२८ लाखांची कामांना अकोला जिल्हाधिका-यांची प्रशासकीय मान्यता

पाणीटंचाई निवारणाच्या १६ कामांना मंजुरी
अकोला: जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात कूपनलिका व विंधन विहिरींच्या १६ कामांना बुधवारी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मंजुरी देण्यात आलेल्या २८ लाखांच्या या कामांमध्ये १४ कूपनलिका आणि २ विंधन विहिरींच्या कामांचा समावेश आहे.
पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे हिवाळ्यापासून जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, उन्हाळ्यात तापत्या उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना जाणवू लागले आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कृती आराखड्याला डिसेंबर २0१४ मध्ये जिल्हाधिकार्यांनी मंजुरी दिली. कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी जिल्ह्यातील १५ गावांमध्ये १४ कूपनलिका आणि दोन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी दिला.
पाणीटंचाई निवारणाच्या या कामांसाठी २८ लाख १0 हजार ४५७ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने, संबंधित गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.