१६ कोटींचे रस्ते; आजपासून अंतिम सुनावणी
By Admin | Updated: December 10, 2014 01:57 IST2014-12-10T01:57:08+5:302014-12-10T01:57:08+5:30
६ कोटी ७0 लाखांवर होणार घमासान.

१६ कोटींचे रस्ते; आजपासून अंतिम सुनावणी
अकोला : सिमेंट काँक्रीट रस्ताप्रकरणी मनपा प्रशासनाविरुद्ध १६ कोटींचा दावा दाखल करणार्या प्रतिभा कन्स्ट्रक्शनने यापूर्वीच १0 कोटींच्या मुद्दय़ावर यू टर्न घेतल्याने उर्वरित ६ कोटी ७0 लाखांच्या रकमेवर आर. बी. ट्रेडर्स लवादसमोर बुधवारपासून अंतिम सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी शहर अभियंता अजय गुजर, विधिज्ञ राजन देशपांडे उपस्थित राहतील.
सन २00१ मध्ये महापालिकेचे तत्कालीन आयुक्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी शहरात १६ कोटीतून सिमेंट काँक्रीटचे १६ रस्ते तयार करण्याची योजना अंमलात आणली. प्राप्त निविदेतून प्रतिभा कन्स्ट्रक्शनला रस्त्याचे काम मिळाले. यादरम्यान १६ कोटींच्या निधीतून संबंधित कंपनीने केवळ आठ सिमेंट रस्त्यांचे निर्माण केले. उर्वरित रस्त्यांचे काम करण्यात आले नाही. उलट २00७ मध्ये प्रशासनाच्या विरोधात मुंबई स्थित आर.बी. ट्रेडर्स लवादाकडे याचिका दाखल करीत १६ कोटींचा दावा ठोकला. या दाव्यावर प्रशासनानेसुद्धा संबंधित कंपनीला प्रतिवादी करीत याचिका दाखल केली तसेच प्रतिभा कन्स्ट्रक्शनने केलेल्या रस्त्यांची पाहणी करण्याचे याचिकेत नमूद केले. त्यानुसार सन २0११ मध्ये आर.बी. ट्रेडर्सच्यावतीने शहरातील आठ सिमेंट रस्त्यांची पाहणी करण्यात आली. याप्रकरणी लवादासमोर नोव्हेंबर २0१३ मध्ये नागपूर येथे ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल, हरीश आलीमचंदानी व संबंधित अधिकार्यांचे बयाण नोंदविण्यात आले.
या सर्व मुद्दय़ांवर मुंबई येथे लवादासमोर १२ मेपासून सुनावणीला प्रारंभ झाला. सुनावणीदरम्यान ५७ पैकी १६ मुद्दय़ांवर चर्चा झाली होती. त्यावेळी अजय गुजर यांनी प्रतिभाने उपस्थित केलेले मुद्दे फेटाळून लावले होते. मनपाची बाजू लक्षात येताच, प्रतिभाने १६ कोटींपैकी १0 कोटींचा दावा मागे घेण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे. उर्वरित ६ कोटी ७0 लाखांचा दावा कायम असून, यासंदर्भात १0 व ११ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.