दुष्काळग्रस्त शेतक-यांना १३0 कोटींचे वाटप बाकी
By Admin | Updated: March 10, 2015 02:06 IST2015-03-10T02:06:43+5:302015-03-10T02:06:43+5:30
१ हजार २ कोटींच्या मदतनिधीतून ८ मार्चपर्यंत १६ लाख ७३ हजार ३0२ शेतकर्यांना ८७२ कोटी ८ लाखांच्या मदतीचे वाटप.

दुष्काळग्रस्त शेतक-यांना १३0 कोटींचे वाटप बाकी
अकोला: दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी प्राप्त झालेल्या मदतीचे वाटप ७ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा शासनामार्फत आदेश देण्यात आला असला तरी, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत १६ लाख ७३ हजार शेतकर्यांना ८७२ कोटी ८ लाखांची मदत वाटप करण्यात आली असून, १३0 कोटींच्या मदतीचे वाटप अद्यापही बाकी आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी १ हजार २ कोटींचा मदतनिधी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्राप्त झाला. प्राप्त झालेला मदतनिधी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत तहसिल स्तरावर वितरित करण्यात आला. मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम १४ जानेवारीपासून तहसील कार्यालयांकडून सुरू करण्यात आले. त्यामध्ये पाचही जिल्ह्यात प्राप्त १ हजार २ कोटींच्या मदतनिधीतून ८ मार्चपर्यंत १६ लाख ७३ हजार ३0२ शेतकर्यांना ८७२ कोटी ८ लाखांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. उर्वरित १३0 कोटींच्या मदतनिधीचे वाटप अद्याप बाकी आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकर्यांना ही मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.