मधमाश्यांच्या हल्ल्यात १३ जण जखमी
By Admin | Updated: December 23, 2015 02:37 IST2015-12-23T02:37:40+5:302015-12-23T02:37:40+5:30
शरद सरोवरावर गेले होते कौटुंबिक कार्यक्रमासाठी

मधमाश्यांच्या हल्ल्यात १३ जण जखमी
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील शरद सरोवर येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेलेल्या तीन कुटुंबांतील सदस्यांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला. यात १३ जण जखमी झाले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालय व खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. गोरक्षण रोडवरील आसरा कॉलनीत राहणारे विष्णू श्याम गरोले यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शरद सरोवर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी नातेवाईक, मित्रमंडळींना स्नेहभोजाला आमंत्रित केले होते. त्यानुसार नातेवाईक, मित्रमंडळी शरद सरोवर येथे गोळा झाली. यादरम्यान एका झाडावरील मधमाश्यांनी सर्व लोकांवर अचानक हल्ला चढविला. मधमाश्यांचा अचानक झालेला हल्ला पाहून सर्वच जण जीव वाचविण्याच्या आकांताने सैरावैरा धावू लागले. मधमाश्या डंख करीत असल्याने आरडाओरडही सुरू झाली. त्यामध्ये नितीन मधुकर काशीद, विष्णू श्याम गरोले, मकरंद खामकर, शोभा मधुकर काशीद, ममता नितीन काशीद, पूनम महेंद्र गरोले, महेंद्र वसंत गरोले, श्लोक महेंद्र गरोले, नारायण गरोले, अजय गरोले, यश काशीद, शंतनु पवार आणि अनिल पवार हे जखमी झाले. जखमींना सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्वांनी सुटी देण्यात आली.