‘बीएचआर’ पतसंस्थेच्या घोटाळय़ातील १३ आरोपी कोठडीत

By Admin | Updated: April 30, 2015 01:53 IST2015-04-30T01:53:22+5:302015-04-30T01:53:22+5:30

अकोला शाखेतील चार कोटी ठेवींच्या गैरव्यवहारप्रकरण; २ मेपर्यंत पोलीस कोठडी.

13 accused in 'BHR' credit union scam | ‘बीएचआर’ पतसंस्थेच्या घोटाळय़ातील १३ आरोपी कोठडीत

‘बीएचआर’ पतसंस्थेच्या घोटाळय़ातील १३ आरोपी कोठडीत

अकोला - भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट पतसंस्थेच्या अकोला शाखेतील चार कोटी ठेवींच्या गैरव्यवहारप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी १३ आरोपींना जळगाव खान्देश येथील कारागृहातून ताब्यात घेतले. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ ही आरोपींना २ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट पतसंस्थेच्या अकोला शाखेत ३ कोटी ९७ लाख ६४ हजार ९४९ रुपयांनी जिल्हय़ा तील शेकडो ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली. त्यामुळे काही ठेवीदारांनी बँकेच्या संचालक मंडळाविरुद्ध पोलिसांत धाव घेतली. यामध्ये जुने शहरातील डाबकी रोडवरील रहिवासी गजानन रामसा धामंदे यांनी बीएचआर पतसंस्थेच्या स्वर्णलक्ष्मी मासिक प्राप्ती योजनेमध्ये ११ टप्प्यांत ७ जानेवारी २0१४ ते ९ एप्रिल २0१४ या कालावधीत १९ लाख रुपयांची रक्कम ठेव म्हणून जमा केली होती. बीएचआर पतसंस्था आणि धामंदे यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार पतसंस्थेने त्यांना दर महिन्याला व्याजाची रक्कम देणे बंधनकारक होते; मात्र बँकेने काही दिवस ही रक्कम दिल्यानंतर व्याजाची रक्कम देणे बंद केले. त्यामुळे त्यांनी १६ ऑक्टोबर २0१४, १३ नोव्हेंबर २0१४, १३ डिसेंबर २0१४ आणि ८ जानेवारी २0१५ रोजी पतसंस्थेला पत्र देऊन ठेवी म्हणून पतसंस्थेत ठेवलेली १९ लाख रुपयांची रक्कम व त्यावरील दरमहा व्याज देण्याची मागणी केली; मात्र बीएचआर पतसंस्थेकडून त्यांची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे गजानन धामंदे यांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. यावरून त्यांनी या प्रकरणाची तक्रार गैरव्यवहारात जबाबदार असलेल्या ३४ संचालकांसह अकोल्यातील बीएचआर शा खेचे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध २३ फेब्रुवारी रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून पोलिसांनी संचालकांसह अधिकारी व कर्मचारी अशा ३४ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४0९, ४२0, १२0 ब आणि एमपीएआयडी १९९९ नुसार गुन्हा दाखल केला. संचालक असलेल्या या प्रकरणातील १३ आरोपींना सिटी कोतवाली पोलिसांनी जळगाव येथील कारागृहातून ताब्यात घेतले असून, या आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: 13 accused in 'BHR' credit union scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.