‘ग्रामज्योती’ अंतर्गत जिल्हय़ात होणार १२४ कोटींची कामे
By Admin | Updated: January 25, 2016 02:14 IST2016-01-25T02:14:11+5:302016-01-25T02:14:11+5:30
ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचे बळकटीकरण होणार असून नऊ वीज उपकेंद्र प्रस्तावित आहेत.

‘ग्रामज्योती’ अंतर्गत जिल्हय़ात होणार १२४ कोटींची कामे
अतुल जयस्वाल / अकोला: ग्रामीण भागात वीज वितरण प्रणालीचे विस्तारीकरण व बळकटीकरण, यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता असलेली केंद्र सरकारची दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना राज्यातही लागू करण्यात आली असून, या योजनेंतर्गत महावितरणकडून अकोला जिल्हय़ात १२४.३९ कोटींची कामे होणार आहेत. ग्रामीण भाग भारनियमनमुक्त करण्यासाठी जिल्हय़ात तब्बल नऊ वीज उपकेंद्रांच्या निर्मितीसह पायाभूत सुविधांची विविध कामे प्रस्तावित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सध्या ग्रामीण भागात वाढती वीज ग्राहक संख्या व आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वापर वाढला आहे. ग्रामीण भागातील विजेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने केंद्र सरकार पुरस्कृत दिनदयाळ उपाध्याय योजना राज्यात राबविण्याला मान्यता दिली आहे. देशातील सर्व राज्यांत ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यात महावितरणकडून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेंतर्गत फिडरचे विलगीकरण, उच्चदाब व लघुदाब वाहिन्या तसेच वीज उपकेंद्रांची निर्मिती व रोहित्रांचे सक्षमीकरण, अशी विविध कामे करण्यात येणार आहेत. महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्हय़ांमध्ये या योजनेंतर्गत विविध कामे प्रस्तावित आहेत. यापैकी अकोला जिल्हय़ात नऊ नवीन वीज उपकेंद्र उभारणे, सहा ठिकाणी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर बसविणे, सात पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढ करणे, ३५३ ठिकाणी नवीन रोहित्रं बसविणे यासारखी एकूण १२४.३९ कोटी रुपयांची विविध कामे प्रस्तावित असल्याची माहिती महावितरणमधील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.