शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी अपात्र
By Admin | Updated: July 31, 2014 02:08 IST2014-07-31T02:07:09+5:302014-07-31T02:08:57+5:30
अकोला जिल्ह्यातील तीन प्रकरणे पात्र; तीन प्रकरणात फेरचौकशीचे निर्देश.

शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी अपात्र
अकोला: शेतकरी आत्महत्या प्रकरणात मदत देण्याबाबत बुधवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत शेतकरी आत्महत्यांची तीन प्रकरणे मदतीसाठीपात्र ठरविण्यात आली असून, १२ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली तर उर्वरित तीन प्रकरणांमध्ये फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हास्तरीय समितीच्या सभेत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या एकूण १८ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली.
त्यापैकी आकोट तालुक्यातील जळगाव नहाटे येथील गजानन श्रीराम गावंडे, बाळापूर तालुक्यातल्या कळंबा येथील रामभाऊ तुळशीराम उगले आणि पातूर तालुक्यातल्या देऊळगाव येथील विष्णू विश्राम कराळे इत्यादी तीन शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली तर शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये सुधाकर भास्कर कुळकर्णी (वरुड बु.), दौलत जागोजी तेलगोटे (कान्हेरी गवळी),अंबादास श्रीराम सावंग (धामणा), पुरुषोत्तम मोतीराम पुंडकर (तांदळी खुर्द), सुनील यशवंत ढोके (कोठारी बु.), विष्णू सीताराम इंगळे (दिग्रस खुर्द), महेंद्र शिवदास गवई (उमरा), वासुदेव सुखदेव दंदी (रिधोरा), देवेंद्र पुंडलिक इंगळे (वाडेगाव), संदीप कैलास सिरसाट (कुपटा), मिलिंद डिगांबर इंगळे (सोनगिरी) व अमोल गौतम धांडे (कवठा) इत्यादी शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा समावेश आहे. उर्वरित तीन शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा परिषद कृषी सभापती रामदास मालवे यांच्यासह कृषी विभाग, जिल्हा उपनिबंधक, पोलिस व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.