अकोला जिल्हय़ात ११ हजार १८२ हेक्टर शेतीचे नुकसान

By Admin | Updated: August 1, 2014 02:24 IST2014-08-01T01:50:32+5:302014-08-01T02:24:09+5:30

पावसाचा तडाखा : अकोला जिल्हा प्रशासनाचा अंदाज

11,182 hectares of agricultural land in Akola district | अकोला जिल्हय़ात ११ हजार १८२ हेक्टर शेतीचे नुकसान

अकोला जिल्हय़ात ११ हजार १८२ हेक्टर शेतीचे नुकसान

अकोला : गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या संततधार पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात ११ हजार १८२ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनामार्फत वर्तविण्यात आला आहे. त्यामध्ये खरवडून गेलेल्या शे तीसह पीक नुकसानीचा समावेश आहे.
यावर्षीचा पावसाळा सुरू झाल्यानंतर महिना उलटून गेला; मात्र पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. गेल्या वीस दिवसांपासून रिमझिम पावसाची हजेरी सुरू होती. तसेच त्यामध्ये गेल्या २२ आणि २३ जुलै रोजी संततधार पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला होता. पाऊस आणि पुरामुळे नदीकाठची शेतजमीन खरवडून गेली. तसेच पेरणीनंतर उगवलेल्या खरीप पिकांचेही प्रचंड नुकसान झाले.
शेती पिकांसह शेतजमीन खरवडून गेल्याने, जिल्ह्यात ११ हजार १८२ हेक्टर शे तीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनामार्फत वर्तविण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गेल्या शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला असून, खरवडून गेलेल्या शेतीसह पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम संबंधित तालुका स्तरावर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांमार्फत सुरू आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानीचे चित्र स्पष्ट होणार
आहे.

१६६ गावांना पावसाचा तडाखा; ७४७ कुटुंब बाधित !
संततधार पाऊस आणि पुराचा जिल्ह्यात १६६ गावांना तडाखा बसला असून, ७४७ कुटुंब बाधित झाली आहेत. तसेच जिल्ह्यातील अकोला, आकोट, तेल्हारा, बाळापूर आणि मूर्तिजापूर या पाच तालुक्यात १६ घरांचे पूर्णत: आणि ९४६ घरांचे अंशत: नुकसान झाले तर ६१ मोठय़ा जनावरांसह २१ लहान जनावरांचा मृत्यू झाला असून, तेल्हारा तालुक्यात १ लाख ५0 हजारांच्या सार्वजनिक सुविधांचे नुकसान झाल्याचेही जिल्हा प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

*मदतीची प्रतीक्षा!
पाऊस आणि पुरामुळे खरवडून गेलेली शेती, पिकांचे झालेले नुकसान आणि घरांच्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू असून, नुकसानभरपाईची मदत केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

*खरवडून गेलेली शेती व
पिकांचे असे आहे नुकसान!
तालुका                 हेक्टर
अकोला                  ७९0
आकोट                 ४९३९
तेल्हारा                 ४000
बाळापूर                 १४५३
एकूण                  १११८२

Web Title: 11,182 hectares of agricultural land in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.