१२ गावांमध्ये होणार १00 कोटींची पाणीपुरवठय़ाची कामे!
By Admin | Updated: March 18, 2016 02:00 IST2016-03-18T02:00:32+5:302016-03-18T02:00:32+5:30
जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत अमरावती -बुलडाणा जिल्ह्यातील गावांमधील कामांचा समावेश.

१२ गावांमध्ये होणार १00 कोटींची पाणीपुरवठय़ाची कामे!
संतोष येलकर/अकोला
जलस्वराज्य प्रकल्प टप्पा क्रमांक २ अंतर्गत अमरावती विभागातील अमरावती व बुलडाणा या दोन जिल्ह्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये १00 कोटींची पाणीपुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत (मजीप्रा) करण्यात येणार आहेत.
जलस्वराज्य प्रकल्प टप्पा क्र.२ अंतर्गत शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने अमरावती विभागातील ४ आणि बुलडाणा जिल्ह्यातील ८ गावांची निवड केली आहे. दोन्ही जिल्ह्यातील शहराजवळील या गावांमध्ये प्रतिमानसी प्रतिदिवस ७0 लीटरप्रमाणे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येकी ५0 कोटी याप्रमाणे दोन्ही जिल्ह्यात १00 कोटींची पाणीपुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने १६ मार्च रोजी मंत्रालयात पाणीपुरवठा स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील ४ गावे आणि बुलडाणा जिल्ह्यातील ४ गावांमध्ये करावयाच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांसंबंधी प्रस्तावांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता गणेश गोखले यांनी सादरीकरण केले. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ४ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांसंबंधी प्रस्तावांना प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून तत्त्वत: प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, बुलडाणा जिल्ह्यातील चार गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांचे प्रस्ताव परत पाठविण्याच्या सूचना प्रधान सचिवांनी दिल्या. अमरावती जिल्ह्यातील चार गावांमध्ये पाणीपुरवठा करण्याच्या कामांसाठी तत्त्वत: प्रशासकीय मान्यता मिळाल्याने, निविदा प्रक्रियेनंतर संबंधित गावांमध्ये ह्यमजीप्राह्णमार्फत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात येणार आहेत.
पाणीपुरवठा योजनांची अशी होणार कामे!
जलस्वराज्य प्रकल्प टप्पा क्रमांक २ अंतर्गत अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या १२ गावांमध्ये १00 कोटींची पाणीपुरवठा योजनांची कामे करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये पाण्याचा उद्भव, जलवाहिनी टाकणे, जलकुंभांची बांधकामे, अशुद्ध पाण्याची जलवाहिनी टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे व वितरण व्यवस्था इत्यादी प्रकारची कामे केली जाणार आहेत.