जिल्ह्यातील शाळांसाठी १ लाख ६१ हजार पुस्तके!
By Admin | Updated: May 15, 2017 02:08 IST2017-05-15T02:08:30+5:302017-05-15T02:08:30+5:30
पुस्तके आली : शिक्षण विभागाने केली होती पहिली ते आठवीच्या पुस्तकांची मागणी

जिल्ह्यातील शाळांसाठी १ लाख ६१ हजार पुस्तके!
नितीन गव्हाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अकोला जिल्ह्यातील प्राथमिक, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांसह अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या १ लाख ६0 हजार पुस्तकांची प्राथमिक शिक्षण विभागाने मागणी केली होती. त्यानुसार रविवारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून जिल्ह्यातील शाळांसाठी १ लाख ६१ हजार ३५२ पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत.
रविवारी प्राथमिक शिक्षण परिषदेने पुण्यावरून ट्रकद्वारे अकोल्यातील सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यालयाकडे पुस्तकांचा पुरवठा केला. रविवारी दुपारी ही पुस्तके उतरविण्यात आली. ‘सारे शिकूया, पुढे जाऊया’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याची योजना अनेक वर्षांपासून राबविण्यात येते. यंदा प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारती व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण विभागाकडे पहिली ते आठवीच्या वर्गासाठी एकूण १ लाख ६0 हजार ९१५ पुस्तकांची मागणी केली होती. जिल्ह्यातील शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि शिक्षण घेताना अडचणी येऊ नयेत, शाळेतील सर्व मुलांची १00 टक्के उपस्थिती टिकून राहावी, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने शासनाच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांसोबतच गणवेशसुद्धा देण्यात येतो. यंदा जिल्ह्यातील प्राथमिक, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांसह अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांना लवकरच शिक्षण विभागाच्या वतीने तालुकानिहाय पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके गटशिक्षणाधिकाऱ्यांना तालुकास्तरावरून केंद्र व शाळास्तरापर्यंत सर्व माध्यमांच्या शाळांना देण्यात येणार आहेत. उन्हाळी सुटी संपल्यानंतर शाळांमध्ये आयोजित समारंभांमधून ही पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात येतील.
इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षण विभागाने १ लाख ६0 हजार पाठ्यपुस्तकांची मागणी केली होती. ही मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने मंजूर करून सर्व शिक्षा अभियानांतर्गत १ लाख ६१ हजार पाठ्यपुस्तके पाठविली आहेत. पुस्तकांचे वितरण करण्यासंदर्भात लवकरच नियोजन करण्यात येईल.
विलास धनाडे, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद