पातूर येथे अत्याधुनिक कोविड सेंटर उभारण्यासाठी १ कोटीचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST2021-04-21T04:18:30+5:302021-04-21T04:18:30+5:30
अकोला: संसर्गजन्य कोरोना विषाणूमुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोनामुळे जिल्हाभरात दररोज होणारे मृत्यू लक्षात घेता ...

पातूर येथे अत्याधुनिक कोविड सेंटर उभारण्यासाठी १ कोटीचा निधी
अकोला: संसर्गजन्य कोरोना विषाणूमुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोनामुळे जिल्हाभरात दररोज होणारे मृत्यू लक्षात घेता पातूर येथे अत्याधुनिक कोविड सेंटर उभारण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी १ कोटी रुपयांच्या निधीचे पत्र मंगळवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या स्वाधीन केले.
जानेवारी महिन्याच्या अखेरीपासून जिल्हाभरात कोरोना विषाणूची लाट आली आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यामुळे घरोघरी कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची व ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत आहे. यामुळे रुग्णांची फरपट होत असून त्यांना वेळेपूर्वी उपचार मिळत नसल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच या सर्व बाबींमुळे वैद्यकीय आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, निवासी उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे गटनेता गोपाल दातकर, मनपातील गटनेता राजेश मिश्रा यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन जिल्हा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पातूर येथील वंदनाताई ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालयात अत्याधुनिक कोविड सेंटर उभारण्यासाठी आमदार निधीतून १ कोटी रुपये मंजूर करण्याचे पत्र जिल्हाधिकारी पापळकर यांना देण्यात आले. एक कोटी रुपयातून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची तातडीने खरेदी केली जाणार असून त्याचा रुग्णसेवेसाठी लवकरच वापर केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.
* * * * * * * * *कोविडसाठी लोकप्रतिनिधींना १ कोटींचा निधी*
संसर्गजन्य कोरोनामुळे वैद्यकीय आरोग्य यंत्रणांवर अतिरिक्त ताण येत असल्याची बाब लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींना कोविड संदर्भात उपाययोजना करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याला मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला निधी मंजूर करण्याचे पत्र दिले.
कोरोनाच्या धर्तीवर पातूर येथे आयसीयू कक्ष, आधुनिक खाटा, व्हेंटिलेटर, मॉनिटर्स, स्ट्रेचर, पेशंट ट्रॉली, व्हॅक्सिन बॉक्स, फ्रिज,ऑक्सिजन सिलिंडर आदी साहित्य खरेदी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यामुळे रुग्णांसाठी सुविधा निर्माण होईल.
-नितीन देशमुख जिल्हाप्रमुख तथा आमदार शिवसेना