कुस्तीपटूचा सराव करताना मृत्यू! आई-वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर; २४ वर्षीय पैलवानाचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 08:57 AM2024-04-16T08:57:17+5:302024-04-16T08:57:45+5:30

कुस्तीच्या आखाड्यात नियतीने केले चितपट

Wrestler dies during training 24-year-old wrestler dies | कुस्तीपटूचा सराव करताना मृत्यू! आई-वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर; २४ वर्षीय पैलवानाचे निधन

कुस्तीपटूचा सराव करताना मृत्यू! आई-वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर; २४ वर्षीय पैलवानाचे निधन

प्रकाश महाले, लोकमत न्यूज नेटवर्क 
राजूर (जि. अहमदनगर)
: खेेडेगावात कुस्तीच्या सोयी-सुविधा नाहीत म्हणून थेट हिंगोली जिल्ह्यातून राजूरमध्ये कुस्तीचे धडे घेण्यासाठी आई-वडिलांनी मुलाची पाठवणी केली. मोठ्या मेहनतीने तो कुस्तीचे विविध डावपेच शिकतही होता. काहीशा कुस्त्या जिंकून त्याने कुशलतेची झलकही दाखवली होती. मात्र २४ वर्षीय या मल्लाला नियतीने कुस्तीच्या आराखड्यातच चितपट केले. सोमवारी सरावादरम्यान त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मुलाने कुस्ती क्षेत्रात करिअर करून ऑलिम्पिक स्पर्धेत खेळावे या त्याच्या आई-वडिलांच्या स्वप्नांचाही एका क्षणात चक्काचूर झाला.

पैलवान मच्छिंद्र लक्ष्मण भोईर (२४, मूळ गाव देवठाणा, जि. हिंगोली) असे मृत कुस्तीपटूचे नाव आहे. साई कुस्ती केंद्रातील कुस्तीपटूंचा नावलौकिक ऐकून मच्छिंद्रच्या आई-वडिलांनी त्याला लॉकडाऊनपूर्वी प्रशिक्षणासाठी राजूर येथे दाखल केले होते. उत्कृष्ट शरीरयष्टी, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मच्छिंद्रने काही दिवसांत नावलौकिक मिळवला. भल्याभल्यांना आपल्या कुस्तीच्या डाव-प्रतिडावाने चितपट करणाऱ्या मच्छिंद्रला सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने गाठले आणि नियतीच्या या डावात तो पराभूत झाला.

ती ठरली अखेरची गदा...
रविवारी रात्री पारनेर तालुक्यातील साकुर मांडवे येथे आयोजित कुस्ती आखाड्यासाठी मच्छिंद्र सहभागी झाला होता. या आखाड्यातील अंतिम कुस्तीही मच्छिंद्रने प्रतिस्पर्ध्यावर मात करत जिंकली. पंधरा हजार रुपयांच्या रोख रकमेसह चांदीची गदाही आपल्या खांद्यावर घेतली होती.

माहीर मल्लाला मुकलो... 
तीन शस्त्रक्रियांवर मात करत मच्छिंद्र पुन्हा उभा राहिला होता. अनेक ठिकाणी झालेल्या कुस्त्यांमध्ये मच्छिंद्रने पहिला क्रमांक पटकावला. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने रौप्य पदक मिळवले होते. २१ तारखेला तो आपल्या गावाकडे कुस्ती स्पर्धांसाठी जाणार होता. एका आवडत्या शिष्याला मुकलो. - तानाजी नरके, प्रशिक्षक, साई कुस्ती केंद्र, राजूर

Web Title: Wrestler dies during training 24-year-old wrestler dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.