शूरा आम्ही वंदिले! : खडे हैं सीमा पर सीना ताने,शिपाई सुरेश नरवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:44 AM2018-08-16T11:44:02+5:302018-08-16T12:05:03+5:30

आतंकवाद्यांनी गोळ्याचा वर्षाव सुरु केला. १३ जवानांनी अतिरेक्यांशी लढाईला सुरुवात केली. सुरेश या लढाईत अग्रभागी होते. त्यांनी झाडावरील काही अतिरेक्यांना लक्ष्य करीत खाली पाडले.

We shouted! : Standing on the border, Sena Tanay, Shipi Suresh Narvade | शूरा आम्ही वंदिले! : खडे हैं सीमा पर सीना ताने,शिपाई सुरेश नरवडे

शूरा आम्ही वंदिले! : खडे हैं सीमा पर सीना ताने,शिपाई सुरेश नरवडे

Next
ठळक मुद्देशिपाई सुरेश नरवडेजन्मतारीख १ जून १९७९सैन्यभरती १९९५वीरगती ३० जुलै २००२वीरमाता गोदाबाई नरवडे

आतंकवाद्यांनी गोळ्याचा वर्षाव सुरु केला. १३ जवानांनी अतिरेक्यांशी लढाईला सुरुवात केली. सुरेश या लढाईत अग्रभागी होते. त्यांनी झाडावरील काही अतिरेक्यांना लक्ष्य करीत खाली पाडले. परंतु पुढे आतंकवाद्यांची संख्या खूप होती. मागचा १२ जणांचा गटही बराच मागे होता. त्यामुळे आता आतंकी व १३ जण आमनेसामने झाले. परंतु अतिरेक्यांनी चोहोबाजूंनी गोळीबार केल्याने भारतीय तुकडी एकटी पडली. आतंकवाद्यांकडून बेछूट गोळीबार सुरू होता. त्यात सुरेश यांच्यासह इतर जवान जखमी झाले. शत्रूच्या गोळीबाराचा जोर इतका वाढला होता, की त्यात ही १३ जणांची तुकडी धारातीर्थी पडली. त्यात सुरेश यांचाही समावेश होता.
नगर तालुक्यातील कल्याण रस्त्यावर असणाऱ्या टाकळी खातगाव येथील शेतकरी पाराजी जबाजी नरवडे व गोदाबाई यांच्या पोटी १ जून १९७९ रोजी सुरेश यांचा जन्म झाला.
पाराजी नरवडे यांना तीन अपत्ये. राजाराम मोठा, रेवणनाथ मधला, तर सुरेश हे धाकटे़ सर्वात लहान असल्याने ते सर्वांचे लाडके ़
शेती व्यवसाय करत पाराजी आपले कुटुंब सांभाळत होते. गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरेश यांचे प्राथमिक, तर हनुमान विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले. बारावी झाल्यानंतर सुरेश नोकरीच्या शोधात होते. एक दिवस गावातील मित्राबरोबर लष्कर भरतीसाठी बेळगावमधील मराठा लाईट इंन्फट्री येथे गेले. पहिल्याच प्रयत्नात भरती होईल, असे वाटत नव्हते. परंतु देशसेवेची प्रबळ इच्छा, प्रचंड आत्मविश्वास कामी आला आणि १९९५ मध्ये सुरेश यांनी भारतीय लष्करात पाऊल ठेवले. आपला मुलगा लष्करात भरती झाल्याचे समजताच आई-वडिलांना प्रचंड आनंद झाला. बेळगाव येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याच्या सुट्टीवर सुरेश घरी आले. गावातील मित्र परिवार त्यांची चौकशी करू लागले. मित्रांबरोबर तसेच कुटुंबीयांबरोबर रमतगमत एक महिन्याची सुट्टी कधी संपली कळले सुध्दा नाही. बेळगाव येथे गेल्यावर त्यांना पहिली पोस्टींग सियाचीन बॉर्डरवर मिळाली. हे ठिकाण जगातील सर्वात उंच ठिकाण असून, येथे पाकिस्तान व चीन या दोन देशांची सीमा भारताच्या सीमेशी मिळते. त्यावेळी या दोन्ही देशांकडून सतत घुसखोरी होत होती. जीवघेण्या थंडीत येथील भारतीय जवानांना जागता पहारा दिल्याशिवाय पर्याय नाही. या सीमारेषेवर पाकिस्तान कायमच आपला हक्क सांगत आलाय. तेव्हाही याच प्रश्नावरून तणाव होता. त्यातूनच येथील नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. परिणामी नागरिकांच्या रक्षणासाठी सैनिक कायम तैनात केले गेले. समुद्रसपाटीपासून सुमारे ५ हजार ७७३ मीटर उंचीवर हे ठिकाण आहे. भारतीय जवानांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येथे सीमेचे रक्षण करावे लागते.
सियाचीन सीमारेषेवरून सुरेश यांची बदली जामनेर (गुजरात) या ठिकाणी झाली. एक वर्ष तेथे सेवा केल्यानंतर त्यांना आसामला पाठवण्यात आले. दरम्यानचे काही काळ ते काही दिवसांसाठी गावाकडे सुटीला आले. वय तेव्हा २५ असावे. घरी त्यांच्या लग्नाचा विचार सुरू झाला. परंतु सुरेश यांनी लग्नासाठी नकार दिला. आधी मातृभूमीची सेवा आणि नंतर संसार अशी खूणगाठच त्यांनी बांधली होती. त्यामुळे लग्नाचा विषय आपसूकच मागे पडला.
सुटी संपल्यावर ते आसामला रवाना झाले. ३३ जिल्ह्यांचे क्षेत्र व्यापलेल्या या राज्यात सुमारे ३५ पेक्षा जास्त आतंकवादी संघटना कार्यरत होत्या. पाकिस्तानी गुप्त एजन्सी (आयएसआय) भारतामध्ये आतंकवाद पसरविण्यासाठी कायम अग्रेसर असत. त्यावेळीही बांगलादेशी आतंक संघटनेशी मिळून त्यांनी उत्तर-पूर्व प्रदेशात हालचाली वाढवल्या. ‘उल्फा’ म्हणजे युनायटेड लिबरेशन फ्रंट आॅफ आसाम ही आतंकवादी संघटनाही सक्रिय होती.
भारतीय शांतता भंग करणे, निष्पाप लोकांचा बळी घेणे व भारतात अशांतता पसरविणे हा मूळ उद्देश या आतंकी संघटनांचा होता. आसाममध्ये गेल्यानंतर सुरेश यांनी आपल्या तुकडीसोबत तेथील भौगौलिक परिस्थितीचा आढावा घेतला. बांगलादेश, भूतान या दोन देशांच्या सीमा आसाम राज्याला लागून आहेत. येथे सीमेवर आतंकवादी नेहमीच हल्ले करतात. या हल्ल्याला शह देण्यासाठी सुरेश यांच्यासह १५ जणांची एक तुकडी या भागात तैनात केली होती.
आलंगा नदीच्या जवळील जंगलात आतंकवादी लपल्याची माहिती गुप्तवार्ता विभागाकडून मिळाली. वरिष्ठांच्या आदेशानुसार सुरेश यांची पंचवीस जणांची तुकडी अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यासाठी पाठवण्यात आली. मात्र अतिरेक्यांची संख्या किती आहे, याचा अंदाज येत नव्हता. आसाममध्ये अति उंच वाढणाºया वृक्षांचे घनदाट जंगल आहे. त्यातच हिंस्त्र प्राणी व आडवे तिडवे वाढलेले गवत यामुळे भर दुपारी काळाकुट्ट अंधार त्या जंगलात जाणवत असे. अशा या भयानक ठिकाणी आतंकवाद्यांनी आपला तळ ठोकला होता. नदी पार करून २५ भारतीय जवानांची तुकडी जंगलाच्या त्या बाजूला पोहोचली. आतंकवाद्यांना जाळ्यात अडकविण्यासाठी सापळा लावण्यात आला. सर्व तयारी झाली. नियोजनाप्रमाणे भारतीय लष्कराचे १३ जवान एका बाजूला व १२ जवान एका बाजूला अशा दोन गटात युनिटचे विभाजन करण्यात आले. १३ जणांच्या तुकडीत सुरेश यांचा समावेश होता. जंगल असल्याने त्यात फक्त पायवाट होती. १२ जवानांच्या गटाने जंगलाच्या पुढच्या बाजूने जाऊन आतंकवाद्यांना घेरायचे, तर १३ जवानांचा दुसरा गट विरूद्ध बाजूने चढाई करून लगेच हल्ला करेल, अशी व्यूहरचना तयार करण्यात आली. काही आतंकवादी झाडावर तर काही जंगलाच्या मधोमध असणाºया उंच ठिकाणी लपून बसले होते. भारतीय सैन्य जंगलात दाखल झाल्याची खबर त्यांना लागली त्यामुळे ते काहीसे सावध झाले. १२ जवानांच्या तुकडीला गोळीबार करायला वेळ होता. पण १३ जणांच्या तुकडीने दुसºया गटाला समोरून येईपर्यत आतंकवाद्यांवर गोळीबार सुरू केला. पायवाट असल्याने व सैनिक एकापाठोपाठ असल्याने झाडावर व उंच ओट्यावर बसलेल्या आतंकवाद्यांनी गोळ्याचा वर्षाव सुरु केला. १२ जवानांच्या गटाचा आधार न घेताच १३ जवानांनी अतिरेक्यांशी लढाईला सुरुवात केली. सुरेश या लढाईत अग्रभागी होते. त्यांनी झाडावरील काही अतिरेक्यांना लक्ष्य करीत खाली पाडले. परंतु पुढे आतंकवाद्यांची संख्या खूप होती. मागचा १२ जणांचा गटही बरेच मागे होता. त्यामुळे आता आतंकी व १३ जण आमनेसामने झाले. परंतु अतिरेक्यांनी चोहोबाजूंनी गोळीबार केल्याने भारतीय तुकडी एकटी पडली. आतंकवाद्यांकडून बेछूट गोळीबार सुरू होता. त्यात सुरेश यांच्यासह इतर जवान जखमी झाले. शत्रूच्या गोळीबाराचा जोर वाढला व ही १३ जणांची तुकडी धारातिर्थी पडली. त्यात सुरेश यांचाही समावेश होता.
आपले सहकारी शहीद झाल्याचे कळताच राहिलेल्या १२ जणांच्या तुकडीचे मात्र भान हरपले. त्यांनी ‘भारत माता की जय’,‘ हर हर महादेव’च्या घोषणा देत शत्रूवर हल्ला चढवला आणि शत्रूला धूळ चारली. भारतमातेचे १३ वीर एकाच वेळी देशासाठी शहीद झाले. अतिरेक्यांशी झुंज देता देता पराक्रम गाजविताना ३० जुलै २००२ रोजी सुरेश यांना हौतात्म्य प्राप्त झाले.
घटना घडली त्या दिवशी रात्री आठ वाजता सुरेश यांच्या घरी कॅप्टनचा फोन आला. त्यांनी घडलेली दु:खद घटना कुटुंबीयांना सांगितली. या घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरली. जुलै महिन्यातील खराब हवामानामुळे आसाममधून विमान उड्डाण थांबविले होते. यामुळे सुरेश यांचे पार्थिव घरी आणण्यास तीन दिवस लागले. २ आॅगस्ट रोजी पुण्यावरुन वाहनाने पार्थिव टाकळी खातगावला पोहोचले. ठिकठिकाणी सुरेश यांचे बॅनर लावण्यात आले होते. सजविलेल्या वाहनातून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ‘सुरेश नरवडे अमर रहे , भारत माता की जय’ अशा जयघोषाने पंचक्रोशी दुमदुमली होती. शासकीय इतमामात व हजारो लोकांच्या उपस्थितीत ३ आॅगस्ट रोजी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गावात  स्मारक
सुरेश यांनी आपल्या कमी काळात केलेल्या पराक्रमाची आठवण रहावी म्हणून टाकळी येथे त्यांचे मोठे स्मारक बांधण्यात आले आहे. गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्या स्मरणार्थ विविध धार्मिक, समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन गावातर्फे केले जाते.

- शब्दांकन : नागेश सोनवणे

Web Title: We shouted! : Standing on the border, Sena Tanay, Shipi Suresh Narvade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.