शूरा आम्ही वंदिले ! : ‘ब्रेव्ह वॉरियर्स’, हवालदार संजय भाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:13 PM2018-08-18T12:13:19+5:302018-08-19T12:37:35+5:30

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हफ्रुडा जंगलात मेजर मोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आॅपरेशन रक्षक ही मोहीम राबविण्यात येत होती़

We shouted! : 'Brave Warriors', constable Sanjay Bhakeer | शूरा आम्ही वंदिले ! : ‘ब्रेव्ह वॉरियर्स’, हवालदार संजय भाकरे

शूरा आम्ही वंदिले ! : ‘ब्रेव्ह वॉरियर्स’, हवालदार संजय भाकरे

Next

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हफ्रुडा जंगलात मेजर मोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आॅपरेशन रक्षक ही मोहीम राबविण्यात येत होती़ आतंकवाद्यांना शोधून त्यांना मारण्याची जबाबदारी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या पॅरा कमांडोंच्या एका तुकडीवर सोपविण्यात आली होती़ त्यानुसार २१ मार्च २००९ रोजी पॅरा कमांडोंची ‘ब्रेव्ह वॉरियर्स टीम’ आतंकवाद्यांच्या शोधार्थ हफ्रुडा जंगलात घुसली़ उंचच उंच डोंगर आणि घनदाट झाडीतून ही टीम आंतकवाद्यांचा शोध घेत होती़ त्याचवेळी उंच टेकडीवर लपलेल्या आतंंकवाद्यांनी भारतीय कमांडोंवर जोरदार हल्ला केला़ कमांडोंनीही या आतंकवाद्यांवर जोरदार प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात चार आतंकवादी मारले गेले़. पण अतिरेक्यांनी टाकलेल्या हॅण्डग्रेनेड आणि तुफानी गोळीबारात ९ जणांची ‘ब्रेव्ह वॉरियर्स टीम’ धारातीर्थी पडली़ यात कमांडो हवालदार संजय अण्णासाहेब भाकरे यांनीही देशासाठी हौतात्म्य पत्करले.
देवळाली (नाशिक) येथील आर्टीलरी सेंटरमध्ये ५ नोव्हेंबर १९९७ रोजी संजय अण्णासाहेब भाकरे टेलिफोन आॅपरेटर म्हणून रुजू झाले़ टेलिफोन आॅपरेटरचे काम म्हणजे कंटाळवाणे, एकदम टाईमपास जॉब असे त्यांना वाटायचे़ या कामात त्यांचे मनही लागत नव्हते़ त्याचवेळी १९९९ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये कारगील युद्ध झाले़ यात भारताच्या सीमा हद्दीतून घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ‘आॅपरेशन विजय’ मोहीम हाती घेतली़ या मोहिमेत संजय भाकरे यांनी टेलिफोन आॅपरेटर म्हणून सहभाग घेतला़ या युद्धात आलेल्या अनुभवामुळे त्यांना कमांडो होण्याची आस लागली़ नाशिक येथे तीन वर्ष सेवा बजावल्यानंतर २००० साली त्यांची बदली मेरठ (उत्तर प्रदेश) येथे झाली़ मेरठला असताना त्यांनी पॅरा कमांडोचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला़ उत्तरप्रदेशमधील नहान येथे पॅरा कमांडो ट्रेनिंग स्कूलमध्ये ते पॅरा स्पेशल फोर्स कमांडोचा कोर्स करण्यासाठी दाखल झाले़ हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर हिमाचल प्रदेश येथेच त्यांना २००१ साली पॅराटूपर पदी नियुक्ती देण्यात आली़ पॅराटूपर म्हणून सेवा बजावत असताना २००१ मध्येच संजय भाकरे यांनी डायव्हिंग (पाणबुडी) चा कोर्स पूर्ण केला़ संजय भाकरे आपल्या करिअरमध्ये एकएक अचिव्हमेंट पूर्ण करीत असतानाच ७ डिसेंबर २००१ रोजी सारिका यांच्या रुपाने त्यांना जीवनसाथी मिळाली़ आष्टी ( बीड) येथील मुरलीधर भोसले यांची सुकन्या सारिका यांच्याशी संजय भाकरे विवाहबद्ध झाले़ त्याचवेळी १३ डिसेंबर रोजी आतंकवाद्यांकडून भारतात हल्ले सुरु झाले़ भारत-पाकिस्तान सीमेवर ताणतणाव वाढला़ त्यामुळे संजय भाकरे यांची सुट्टी संपताच त्यांना जम्मूकाश्मीरला हजर होण्यास सांगण्यात आले़
हिमाचल प्रदेश येथे त्यांना निवासस्थान मिळाले होते़ त्यामुळे सुट्टी संपल्यानंतर त्यांनी सारिका यांनाही हिमाचल प्रदेश येथे ठेवले व ते जम्मूकाश्मीरला रवाना झाले़ जम्मूकाश्मीरमध्ये ‘आॅपरेशन पराक्रम’ ही मोहीम लष्कराकडून हाती घेण्यात आली होती़ त्यासाठी संजय भाकरे यांची निवड करण्यात आली होती़ सुमारे दीड वर्ष सीमेवर सेवा केल्यानंतर पुन्हा ते हिमाचल प्रदेशमध्ये नहान येथे युनिटला आले़ आॅपरेशन पराक्रममध्ये संजय भाकरे यांच्या योगदानामुळे २००३ मध्ये त्यांना पॅरा (स्पेशल फोर्सेस) कमांडोमध्ये लान्सनायक पदी बढती मिळाली़ तेथेही त्यांनी उत्कृष्ट योगदान दिले़ दरम्यान २००४ साली मुलगा आदित्यचा जन्म झाला़ त्यावेळी संजय भाकरे हे आर्मीत नव्याने येणाऱ्या तरुणांना खोताखोर (पाणबुडी) बनण्याचे प्रशिक्षण देत होते़ २००४ साली भारतीय महासागरात त्सुनामी आली़ याच महासागरात खोताखोरीचे प्रशिक्षण सुरु होते़ मात्र, संजय भाकरे यांच्या मुत्सद्दी निर्णयामुळे त्यांच्यासह इतर सर्व प्रशिक्षणार्थी टीम सुखरुप कॅम्पमध्ये पोहोचली होती़ पॅरा कमांडोमध्ये उत्कृष्ट योगदान दिल्यामुळे संजय भाकरे यांची तेथेच फर्स्ट पॅरा कमांडोमध्ये २००६ साली बदली झाली़ त्यावेळी अंजलीच्या रुपाने घरात लाडल्या परीचा जन्म झाला होता़
दोन आॅपरेशनचा अनुभव गाठी असलेल्या लान्सनायक पॅरा कमांडो संजय भाकरे यांची २००८ साली नायक पदी नियुक्ती करण्यात आली़ त्याचवेळी सीमेवर पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून गोळीबार होत होता़ अनेक आतंकवादी भारतीय हद्दीत घुसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती़ त्यामुळे नोव्हेंबर २००८ मध्ये नहान येथून संजय भाकरे यांचे पूर्ण युनिटच जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे पोहोचले़ या युनिटमध्ये ५०० जवानांचा सहभाग होता़ दरम्यान संजय भाकरे यांना नायक पदावरुन हवालदार पदावर बढती देण्यात आली़
पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हफ्रुडा जंगलात आश्रय घेतल्याची माहिती लष्कराला मिळाली होती़ त्यामुळे या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मेजर मोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आॅपरेशन रक्षक ही मोहम हफ्रुडा जंगलात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ या दहशतवाद्यांना शोधून त्यांना मारण्याची जबाबदारी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या पॅरा कमांडोंच्या एका तुकडीवर सोपविण्यात आली होती़ त्यानुसार २१ मार्च २००९ रोजी पॅरा कमांडोंची ‘ब्रेव्ह वॉरियर्स टीम’ आतंकवाद्यांच्या शोधार्थ हफ्रुडा जंगलात घुसली़ उंचच उंच डोंगर आणि घनदाट झाडीतून ही टीम आतंकवाद्यांचा शोध घेत होती़ त्याचवेळी उंच टेकडीवर लपलेल्या आतंकवाद्यांनी भारतीय कमांडोंवर जोरदार हल्ला केला़ या हल्ल्यात चार कमांडो जखमी झाले़ या जखमी कमांडोंना मेजर शर्मा व हवालदार संजय भाकरे यांनी सुरक्षितस्थळी हलविले़ परंतु आतंकवाद्यांनी या कमांडो टीमवर पाळत ठेवली होती़ कमांडोही आपल्या खबºयांमार्फत जंगलातील हालचालींवर लक्ष ठेवून होते़ एका ठिकाणी मानवी विष्ठा या कमांडोंना दिसल्यामुळे त्या परिसरात अतिरेकी लपल्याची त्यांची खात्री पक्की झाली़ कमांडो टीम सावध झाली़ रायफलच्या स्ट्रीगरवर बोट ठेवून डोळ्यात तेल घालून कमांडो आतंकवाद्यांचा शोध घेऊ लागले़ एका झाडीआड संशयित हालचाली दिसताच कमांडोंनी जोरदार गोळीबार केला़ यात चार आतंकवादी मारले गेले़ त्यामुळे चिडलेल्या अतिरेक्यांनी कमांडोंवर हॅण्डग्रेनेड आणि तुफानी गोळीबार सुरु केला़ यात नऊ जणांची ‘ब्रेव्ह वॉरियर्स टीम’ धारातीर्थी पडली़ देशासाठी मेजर मोहित शर्मा यांच्यासह कमांडो हवालदार संजय भाकरे यांनीही देशासाठी हौतात्म्य पत्करले़ त्यामुळे मेजर मोहित शर्मा यांना अशोक चक्र तर संजय भाकरे यांना सेना मेडल देऊन गौरविण्यात आले़
दहशतवाद्यांनी मृतदेह उचलू दिले नाही
मेजर मोहित शर्मा यांच्या टीमने यापूर्वी राबविलेल्या आॅपरेशनमध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते़ तर एका चकमकीत एका अतिरेक्याचे शीरच धडावेगळे करण्याचा पराक्रम शर्मा व टीमने केला होता़ त्यामुळे दहशतवादी शर्मा व टीमवर पाळत ठेवून होते़ हाफ्रुडा जंगलात चार अतिरेक्यांना यमसदनी धाडून ही टीम धारातीर्थी पडली़ पण अतिरेक्यांनी ‘ब्रेव्ह वॉरियर्स’मधील सर्व ९ कमांडोंचे मृतदेह दोन दिवस उचलू दिले नाहीत़ जे जवान मृतदेह उचलायला येतील, त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला जात होता़ अखेरीस लष्कराने सर्च आॅपरेशन राबवून वेगवेगळ्या तुकड्या हाफ्रुडा जंगलात घुसविल्या़ मात्र, याची माहिती मिळताच आतंकवाद्यांनी तेथून पळ काढला आणि दुसºया दिवशी सायंकाळी सर्व कमांडोंचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले.
दिल्ली विमानतळावर वीरपत्नीचा टाहो
संजय भाकरे यांच्या डोक्यातून एक गोळी आरपार गेली होती़ त्यावेळी सारिका हिमाचल प्रदेशमधील नहान येथील क्वार्टरमध्ये होत्या़ क्वार्टरच्या सीओ मॅडमने संजय भाकरे जखमी झाल्याची माहिती संगीता यांना देत दिल्लीला बोलावल्याचे सांगितले़ पण सारिका दिल्ली येथे गेल्या असता त्यांना संजय यांचा चेहराही पाहू दिला नाही़ त्यामुळे त्या ओक्साबोक्सी रडू लागल्या़ एका जवानासोबत त्यांना विमानाने औरंगाबाद येथे व औरंगाबाद येथून मोटारीने तत्काळ पाटोदा येथे पाठविण्यात आले़ त्यानंतर चौथ्या दिवशी संजय भाकरे यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने पाटोदा येथे आणण्यात आले़ त्यावेळी भाकरे कुटुंबीय शोकसागरात बुडाले होते़ घरात हलकल्लोळ माजला. सारिका यांना दु:ख अनावर झाले.
वीरपत्नी नगरला स्थायिक
संजय भाकरे हे मूळ पाटोदा (जि़ बीड) येथील, पण त्यांच्या वीरपत्नी सारिका या दरेवाडी (ता़ नगर) येथील वैद्य कॉलनीजवळ आवारे टॉवर्स येथे राहातात़ त्या आता येथेच स्थायिक झाल्या आहेत.

साहेबराव नरसाळे

Web Title: We shouted! : 'Brave Warriors', constable Sanjay Bhakeer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.