पाठलाग करणारे रोडरोमिओ मुलींसाठी ठरतायेत खलनायक; एकतर्फी प्रेमातून निर्माण होते विकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 02:32 PM2020-02-05T14:32:53+5:302020-02-05T14:34:04+5:30

अनेकवेळा एकतर्फी प्रेमातून रोडरोमिओ मुलींचा पाठलाग करतात. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. जबरदस्तीने प्रेम व्यक्त करतात. मुलीने नकार दिला तर विनयभंग, शारीरिक अत्याचार तर कधी ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून दिले जाते. अशाच स्वरुपाच्या विकृतीतून कोपर्डी, हिंगणघाटसारख्या घटना घडत आहेत. या विकृत मानसिकतेला पायबंद घालण्याची सर्वांचीच सामूहिक जबाबदारी असल्याचे मत नगर शहरातील महिला, मुलींनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

The villain in the chase Rodromio is destined for girls; One-way love creates distortions | पाठलाग करणारे रोडरोमिओ मुलींसाठी ठरतायेत खलनायक; एकतर्फी प्रेमातून निर्माण होते विकृती

पाठलाग करणारे रोडरोमिओ मुलींसाठी ठरतायेत खलनायक; एकतर्फी प्रेमातून निर्माण होते विकृती

Next

अरुण वाघमोडे । 
अहमदनगर : शाळा-महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थिनी, नोकरी करणा-या महिला तसेच घरसंसार संभाळणा-या गृहिणी घराबाहेर पडतात तेव्हा त्यांना विविध ठिकाणी छेडछाडीचा सामना करावा लागतो. अनेकवेळा एकतर्फी प्रेमातून रोडरोमिओ मुलींचा पाठलाग करतात. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. जबरदस्तीने प्रेम व्यक्त करतात. मुलीने नकार दिला तर विनयभंग, शारीरिक अत्याचार तर कधी ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून दिले जाते. अशाच स्वरुपाच्या विकृतीतून कोपर्डी, हिंगणघाटसारख्या घटना घडत आहेत. या विकृत मानसिकतेला पायबंद घालण्याची सर्वांचीच सामूहिक जबाबदारी असल्याचे मत नगर शहरातील महिला, मुलींनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे सोमवारी (दि़३) सकाळी एकतर्फी पे्रमातून एका नराधमाने २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून भररस्त्यात तिला पेटवून दिले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. एकतर्फी प्रेमातून पाठलाग करणारे रोडरोमिओच महिला-मुलींसाठी खलनायक ठरत असल्याचे अनेक घटनांतून समोर आले आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या दिलासा सेलअंतर्गत असलेल्या निर्भया पथकाने गेल्या तेरा महिन्यांत नगर शहरासह परिसरातील गावांत महिला-मुलींची छेडछाड काढणा-या २ हजार टारगट तरुणांवर कारवाई केली आहे. यात १५ ते २५ या वयोगटातील मुलांचा सर्वाधिक समावेश आहे. यातील अनेकांनी शिक्षण सोडून दिलेले आहे. महाविद्यालय परिसर, बसस्थानक, तसेच रस्त्याने जाता-येताना हे तरुण मुलींची छेड काढत होते. 
या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांसमोर त्यांना समज देण्यात आली़. दिलासा सेलच्या उपनिरीक्षक जयश्री काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजेंद्र वाघ, कॉन्स्टेबल उमेश इंगवले, सादिक शेख, बापू फरतडे, पोलीस नाईक सुलभा औटी, एस़एस़ कुचे, योगिता साळवे आदी कर्मचारी या पथकात कार्यरत आहेत. अशा घटनांबाबत शहराच्या ठिकाणी पोलीस दक्षता घेत असले तरी ग्रामीण भागात शिक्षण घेणा-या मुलींमध्ये मात्र असुरक्षिततेची भावना आहे. 
दोन महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. पोलीस प्रशासनाने नगर शहरासारखे प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर निर्भया पथक तयार करून पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी ग्रामीण भागातील पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. 
पोलीस प्रशासन दक्ष
महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासन दक्ष आहे. शहरासह ग्रामीण भागात महिला व मुलींबाबत कुठे काही अनुचित प्रकार घडला तर तत्काळ १०० या क्रमांकावर अथवा पोलीस ठाण्याच्या क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती द्यावी. पालक व शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनीही अशा घटनांबाबत पोलिसांना वेळोवेळी कल्पना द्यावी. या माहितीतून तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत शाळा, महाविद्यालयात प्रबोधनात्मक शिबिर घेतले जात आहेत, असे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील यांनी सांगितले.  
महिलांसाठी दिलासा सेल कार्यरत
महिलांसाठी पोलीस प्रशासनाचा दिलासा सेल कार्यरत आहे. या सेलअंतर्गत असलेल्या निर्भया पथकामार्फत नगर शहर व परिसरात दररोज पेट्रोलिंग केली जाते़. या दरम्यान कुणी महिला-मुलींची छेड काढताना आढळून आले अथवा मुलींनी तक्रार केली तर कारवाई केली जाते. कुणी छेड काढत असेल तर महिला-मुलींनी न घाबरता पोलिसांशी संपर्क करावा. पालक अथवा आपल्या शिक्षकांना याबाबत कल्पना द्यावी़, असे दिलासा सेलच्या प्रमुख जयश्री काळे यांनी सांगितले.  
मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्या
शहरासह ग्रामीण भागात मोठ्या संंख्येने विद्यार्थिनी शिक्षण घेतात. मुलींबाबत काही अनुचित प्रकार घडला तर प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचणे शक्य नाही. यासाठी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. चुकीच्या मार्गाने जाणा-या तरुणांसह मुलींचेही प्रबोधन होणे गरजेचे आहे. समाजातील या चुकीच्या घटनांना पोलीस, शिक्षक, पालक व मुले स्वत: आळा घालू शकतात. यासाठी प्रत्येकाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे शेवगाव येथील न्यू आर्टस् महाविद्यालयाचे प्राचार्य पुरूषोत्तम फुंदे यांनी सांगितले.  
..तर मुली सुरक्षित राहतील
घराबाहेर पडल्यानंतर मुलींना बहुतांशीवेळा छेडछाडीचा सामना करावा लागतो़. तक्रारीनंतर पोलिसांकडून कारवाई होते. या घटनांना पायबंद घालण्यासाठी केवळ पोलिसांवर अवलंबून राहणे योग्य नाही़. मुलींनीही खंबीर होऊन अशा घटनांचा हिमतीने प्रतिकार करणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा प्रवृत्तींविरोधात उभे राहिले तर महिला आणि मुली स्वत:ला सुरक्षित समजतील, असे विद्यार्थिनी गीतांजली खाडे यांनी सांगितले.  
सुरक्षेविषयी प्रबोधनाची गरज
घराबाहेर पडणा-या मुलींच्या सुरक्षेची सर्वांची जबाबदारी आहे. मुलींना त्रास देणा-यांवर प्रथम शाळा, महाविद्यालय प्रशासनाने कारवाई करावी. परिसरात सीसीटीव्ही बसवावेत. घराबाहेर पडल्यानंतर मुलगा काय करीत आहे याची माहिती पालकांनी ठेवावी. आपला मुलगा चुकीचे वागत असेल तर त्याला समज द्यावी़. विद्यालयात महिलांच्या सुरक्षेबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत़, असे अ‍ॅड. अनुराधा येवले यांनी सांगितले.

Web Title: The villain in the chase Rodromio is destined for girls; One-way love creates distortions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.