नगर अर्बन बँक : संचालकांची प्रतिमा समोर आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:02 PM2019-08-03T13:02:44+5:302019-08-03T13:04:09+5:30

बँकांची आर्थिक परिस्थिती ही वर-खाली होत असते़ मात्र, प्रशासक नेमण्याची वेळ का आली? याचा विचार व्हायला पाहिजे.

Urban Urban Bank: The image of the director came out | नगर अर्बन बँक : संचालकांची प्रतिमा समोर आली

नगर अर्बन बँक : संचालकांची प्रतिमा समोर आली

Next

अहमदनगर : बँकांची आर्थिक परिस्थिती ही वर-खाली होत असते़ मात्र, प्रशासक नेमण्याची वेळ का आली? याचा विचार व्हायला पाहिजे. नगर अर्बन बँकेवर प्रशासक नेमल्यामुळे संचालक मंडळाची प्रतिमा समोर आली आहे, अशी टिप्पणी आरबीआयचे निवृत्त चीफ जनरल मॅनेजर व अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी केली.
गुरुवारी आरबीआयने बँकेचा ताबा घेऊन मिश्रा यांना प्रशासक नेमल्यानंतर शुक्रवारी मिश्रा यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला़ यावेळी ते म्हणाले, नगर अर्बन बँकेवर प्रशासक म्हणून माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे. बँकेचा एनपीए मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने प्रशासक नियुक्तीचा निर्णय आरबीआयकडून घेण्यात आलेला आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत असून ठेवीदारांनी घाबरण्याचे कारण नाही. ठराविक १५ ते २० कर्जदारांकडे १०० ते १५० कोटींची थकबाकी आहे. त्याची वसुली करून बँकेला एनपीएमधून लवकरात लवकर बाहेर काढण्याचा आमचा उद्देश आहे़ सध्या बँकेचे आॅडिट सुरू आहे. कर्जाच्या प्रत्येक खात्याची तपासणीही करणार आहे. बँकेला कोणत्याही प्रकारचा आर्थिक तोटा नाही व बँक आर्थिक अडचणीत नाही. ज्या नागरिकांच्या काही तक्रारी असतील किंवा काही सांगायचे असेल, तर त्यांनी आपल्याशी थेट संपर्क करावा, असेही त्यांनी म्हटले आहेत. बँकेचे आॅडिट संपल्यानंतर आरबीआयचे स्वतंत्र आॅडिट होणार आहे.
बँकेचे व्यवहार सुरळीतपणे सुरू राहणार आहेत. त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कर्जवाटपाबाबत नव्याने कोणतेही निर्बंध आम्ही घातलेले नाहीत. मागील वर्षीच आरबीआयने कर्जासाठीची मर्यादा ठरवून दिलेली आहे, असेही ते म्हणाले.

चार कारखान्यांकडे मोठी थकबाकी
नगर जिल्ह्यातील चार सहकारी साखर कारखान्यांकडे मोेठ्या प्रमाणात थकबाकी आहे. यामध्ये नगर तालुका, अकोले, कर्जत व पारनेर येथील साखर कारखान्यांचा समावेश आहे.

जास्तीत जास्त वसुली कशी होईल व लवकरात लवकर एनपीए कमी कसा होईल, यासाठी सर्वांची मदत घेतली जाईल. कर्जदाराने पैसे भरले नाहीत, तर त्याच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत, असा इशाराही मिश्रा यांनी दिला आहे.

निवडणूक लांबण्याची शक्यता
नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे. प्रशासक म्हणून माझी नियुक्ती झाल्याने संचालक मंडळाचे निलंबन करण्यात आले आहे. जोपर्यंत एनपीए कमी होत नाही, तोपर्यंत माझी नियुक्ती असणार आहे. आरबीआय माझी नियुक्ती मागे घेत नाही, तोपर्यंत बँकेची निवडणूकही होणार नाही, असेही प्रशासक मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Urban Urban Bank: The image of the director came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.